मित्र बोलत नाही म्हणून त्याच्यावर ब्लेडने हल्ला करण्यासारखी नवी मुंबईतील घटना असो वा सेलफोन चोरताना पाहिले म्हणून आपल्याच शाळेतील मुलाचे अपहरण करून खंडणीसाठी त्याची हत्या करण्यासारखे कृत्य असो. पौगंडावस्थेतील मुलांच्या हातून घडलेली ही हिंसक कृत्ये या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित करतात. तसेच केवळ पौगंडावस्थेतीलच नव्हे तर त्या पेक्षा किती तरी लहान वयाची मुले छोटय़ा-मोठय़ा गोष्टींवरून हिंसक होताना आपल्याला दिसतात. मुंबईसारख्या महानगरीत या गुन्ह्य़ांचे गांभीर्य अधिक प्रकर्षांने जाणवतेच पण, देशाच्या स्तरावरही बाल गुन्हेगारीचे प्रमाण मोठय़ा संख्येने वाढते आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीत बाल गुन्हेगारांच्या अटकेचे प्रमाण २०१२च्या तुलनेत २०१३मध्ये तब्बल ९ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. या आकडेवारीच्या मदतीने देशातील बाल गुन्हेगारीच्या प्रश्नावर सुहास बिऱ्हाडे यांनी टाकलेला हा प्रकाश.
बाल गुन्हेगारांचे प्रमाण वाढल्याचे ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीतून स्पष्ट होते. २०१३ मध्ये बालगुन्हेगारांना अटक करण्याचे प्रमाण २०१२ च्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढले आहे. २०१२ मध्ये बालगुन्हेगारांची संख्या ४१ हजार ६२९ बालगुन्हेगारांना अटक झाली होती. त्यात २०१३ मध्ये ४३ हजार ५०६ बालगुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यात १ हजार ८६७ या मुली होत्या.
खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, जबरी चोरी, विनयभंग, बलात्कार आदी गंभीर गुन्हय़ात या बालगुन्हेगारांचा समावेश आहे. २०१३ या वर्षांत अटक करण्यात आलेले २८ हजार ८३० बालगुन्हेगार हे १६ ते १८ वर्षे वयोगटातील होते. महाराष्ट्रात २०१३ या वर्षांत हत्येच्या प्रकरणात २०१ बालगुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. त्यावरून अल्पवयीन मुले करीत असलेल्या गंभीर गुन्ह्य़ांची कल्पना येऊ शकेल.
सुशिक्षित कुटुंबातही बालगुन्हेगार
गेल्या काही दिवसांत अल्पवयीन शाळकरी मुलांनी केलेल्या अनेक गंभीर गुन्ह्य़ांनी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हेविषयक मालिका, सिनेमे पाहून असे गुन्हे करीत असल्याची प्रेरणा मिळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जे बालगुन्हेगार गंभीर गुन्हे करतात ते पूर्वी रस्त्यावर राहणारे, अनाथ किंवा त्याच पाश्र्वभूमीचे असायचे, परंतु आता चांगल्या घरातील अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग यात दिसून येत आहे.
अनेक चांगल्या घरातील, सुशिक्षित कुटुंबातील मुले सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात सक्रिय असल्याचे आढळून आल्याचे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले. आजूबाजूचे बिघडलेले वातावरण, टीव्ही, सिनेमातून दाखवले जाणारे फसवे जग यामुळे कमी वयात झटपट पैसा, सुख मिळविण्याच्या नादात ही मुले गुन्हेगारीकडे वळतात असेही त्यांनी सांगितले. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारे अनेकदा त्यांचेच अल्पवयीन मित्र असतात. आपण काय करतो याची त्यांना जाणीव नसते आणि कुणी त्यांना माहिती करून दिलेली नसते.
बालगुन्हेगारीच्या
काही ताज्या घटना
* २६ जून २०१५- श्रीरामपूर येथे सातवीत शिकणाऱ्या किरण सोनावणे याची त्याच्याच     वर्गमित्रांनी हत्या केली होती.
* डिसेंबर २०१४ – चेन्नईतील वेल्लरो जिल्हय़ातील ११ वर्षीय मुलीवर तिच्याच शाळेतील १५ वर्षीय मित्राने बलात्कार करून हत्या केली.
* जुलै, २०१५ – नालासोपाऱ्यातील नितेशा तिवारी या १३ वर्षीय विद्यार्थ्यांची त्याच्याच शाळेतल्या दहावीत शिकणाऱ्या दोन मुलांना मोबाइल चोरी करताना पाहिले होते. त्यांना‘डॉन’बनायचे होते. त्यांनी नितेशाचे अपहरण करून त्याची हत्या केली आणि त्याच्या वडिलांकडे ५ लाखांची खंडणी मागितली.
* २९ मे, २०१५ – माटुंगा येथील सुधारगृहात १७ वर्षीय आमिर अहमद या विद्यार्थ्यांची त्याच्याच सहकाऱ्यांनी क्रिकेटच्या बॅटने मारून हत्या केली.