सह्य़ाद्री साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगामासाठी नोंदणी झालेल्या २२ हजार हेक्टर ऊस क्षेत्रापैकी ६३ दिवसात ४ लाख ६५ हजार मेट्रिक टनाचे गाळप झाले. तर, गतवर्षी आजअखेर ७६ दिवसांत ५ लाख ८०० मेट्रीक टनांचे गाळप झाले होते, आता कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही ‘सह्य़ाद्री’ चे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्य़ाद्री सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील पाच लाख पस्तीस हजारावरील पहिल्या पाच पोत्यांच्या पूजन प्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष बबनराव यादव, संचालक मानसिंगराव जगदाळे, संभाजीराव गायकवाड, सुरेशराव माने, तानाजी जाधव, किशोर पाटील, माणिकराव पाटील, डी. बी. जाधव यांची उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, की गतवर्षी हेक्टरी १०७ टन सरासरी ऊस उत्पादनात यंदा १८ टनांची वाढ झाली असून, हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादन झाले आहे. कारखान्याकडे नोंद असलेल्या क्षेत्रापैकी अद्याप सतरा हजार हेक्टर क्षेत्रातील उसाचे गाळप होणे शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ झाली आहे. यंदा साखर उतारा ११.६२ असून, डिस्टिलरीकडे पूर्ण क्षमेतेने अल्कोहल उत्पादन सुरू असून, आजअखेर रेक्टिफाइड स्पिरिट २७२७८६३ लिटर्स तर ई. एन. ए. ८७५३१ लिटर्स उत्पादन झाले आहे. कारखान्याकडे गत वर्षीची ९ लाख साखर पोती शिल्लक असून, त्यामध्ये या वर्षीच्या पाच लाख साखर पोत्यांची भर पडली आहे. गतवर्षी साखरेचा दर ३ हजार रुपये इतका होता तर, या वर्षी हाच साखरेचा दर २ हजार ४०० रुपयांपर्यंत खाली आला असल्याचे त्यांनी सांगितले.