उन्हाळ्यात ६९ दिवसांनी, पावसाळ्यात २२ दिवसांनी नळपाणी पुरवठा होणारे शहर म्हणून मनमाडची संपूर्ण राज्यात चर्चा असतानाही नगरपालिका प्रशासनाने पाणीपट्टीत १०० रुपयांची वाढ करीत मनमाडकरांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहण्याचे ठरविले आहे.
पाणी शुद्धीकरणासाठी निकृष्ट दर्जाची पावडर वापरली जाते. असुरक्षित व अपूर्ण पाणीपुरवठा केला जातो अशा परिस्थितीत हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी पाणीपट्टीत वाढ करण्याचे अजब धोरण पालिका प्रशासनाने राबविले असल्याची टीका काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रहेमान शाह यांनी केली आहे. संपूर्ण शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून गटारी घाण पाण्याने भरल्या आहेत. परिसरात दरुगधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारीचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. रोगराईमुळे दवाखान्यांमधील गर्दीत वाढ होत आहे. असे सर्वकाही असताना प्रशासनाने पाणीपट्टी व घरपट्टीत वाढ करून मनमाडकरांच्या जखमेवर जणूकाही मीठ चोळण्याचे काम केले आहे. मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. खड्डय़ांमुळे पादचारी आणि वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे. याविरोधात राजकारण बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी लोकहितासाठी एकत्र यावे आणि प्रशासनाला जाग आणावी, असे आवाहन रहेमान शाह आणि जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नहार, सरचिटणीस भीमराव जेजुरे आदींनी केले आहे.