रायगड जिल्ह्य़ातील शेतकरी भातशेतीबरोबरच रेती, मासेमारी आदी जोडव्यवसाय करीत आहेत. पावसाळ्यात उजाड डोंगरमाथ्याचा वापर करून कष्टाने मोठय़ा प्रमाणात भाजीपाला पिकवीत असून शेतकऱ्यांना कष्टाचा लळा, पिकवितो डोंगरमाथ्यावर भाजीपाल्याचा मळा असे चित्र येथील डोंगरमाथ्यावर दिसू लागले आहे. श्रावणात सध्या उपवास व शाकाहारी असलेले येथील ग्रामस्थ या डोंगरमाथ्यावरील भाज्यांचा आस्वाद घेत आहेत. भाजी स्वस्त असल्याने त्याची मागणीही वाढली आहे. कोकणातील शेतकरी विविध मार्गानी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असतात. त्यासाठी भातशेतीच्या जोडीला भाजी लागवडही त्यांनी सुरू केली आहे. पावसाचे आगमन झाले की घराच्या अंगणात विविध प्रकारच्या भाज्याचे बी टाकले जाते. त्यासाठी वर्षभर आवारात शेणखत तसेच इतर नैसर्गिक खतांचे आवरण तयार करून त्याची मशागत केली जाते. घराजवळच येणाऱ्या या भाजीचा वापर स्वत:च्या कुटुंबाला तसेच त्याची विक्री करून कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महिला याचे प्रयोजन करीत असतात. अशाच प्रकारे अनेक गावांत शेतीच्या बांधावरून विविध प्रकारच्या भाज्यांचे बी पेरून त्यातूनही भाजीचे पीक घेऊन उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच प्रकारे आठ महिने उजाड असणाऱ्या डोंगरमाथ्यावर मशागत करून पावसाचे आगमन होताच शिराळी, पडवळ, काकडी, कारले, चिबूड, तोंडली या भाज्यांची लागवड केली जाते. या लागवडीत पावसाचे पाणी डोंगरमाथ्यावरून येत असल्याने पाणी देण्याची किंवा त्याचे नियोजन करण्याची आवश्यकता भासत नसल्याची माहिती जोहे येथील शेतकरी काशिनाथ पाटील यांनी दिली. वर्षभर परजिल्ह्य़ातून किंवा वाशी बाजारपेठेतून भाजी विकत आणून त्याची बाजारात विक्री केली जाते. यामध्ये मेहनत अधिक व नफा कमी अशी स्थिती असते; परंतु स्वत: या डोंगरमाथ्यावर लागवड केलेली भाजी ग्राहकांना स्वस्तात मिळत असल्याने नफाही अधिक होत असल्याचे भाजीविक्रेत्या सुकाबाई मढवी यांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे हा येथील शेतकऱ्यांचा एक जोडव्यवसाय असला तरी या शेतीसाठी शासनाकडून हवी तशी मदत होत नसल्याची खंत रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. अशा व्यवसायालाही शेती विभागाने प्रोत्साहन देऊन भाजीपाल्याचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.