सहकार कायद्यातील नवीन दुरुस्त्यांमुळे सहकारी संस्थांमधील संचालक मंडळाबरोबरच सभासदांचीही जबाबदारी वाढली असल्याचे भान ठेवावे लागणार असल्याची जाणीव राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी करून दिली.
सांगोला अर्बन को-ऑप. बँकेच्या अकलूज शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पणन व रोहयोमंत्री गणपतराव देशमुख होते. या वेळी आमदार हणमंत डोळस, दि. सासवड माळी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे, जिल्हा उपनिबंधक लावंड आदी उपस्थित होते.
बँकेचे अध्यक्ष के. एस. माळी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
जिल्हा उपनिबंधक लावंड यांनी जिल्हय़ात ४३ नागरी सहकारी बँका असून, त्यापैकी ७ अवसायनात गेल्याचे सांगत कुवत व परतफेडीची हमी बघून कर्जवाटप करून कारभारात पारदर्शकता आणण्याचे त्यांनी आवाहन केले.
माजी मंत्री आमदार गणपतराव देशमुख यांनी राज्यात ५२ प्रकारच्या २ लाख २७ हजार सहकारी संस्था असून, त्यापैकी जवळपास ९७ हजार संस्था या गृहनिर्माण संस्था आहेत व या सहकारातूनच महाराष्ट्राची प्रगती झाल्याचे सांगितले.
विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात राज्यातील प्रक्रिया संस्थांचे मोठय़ा प्रमाणात खासगीकरण होत असून सध्या सहकारी संस्था अडचणीतून जात आहेत. त्यामध्ये दोष असतीलही, परंतु सहकारावरील विश्वास वाढवणे गरजेचे आहे. गुजरात सरकार न्यायालयात गेल्याने सहकार कायद्यातील दुरुस्ती थांबली असली तरी भविष्यात ती होणार आहे. त्या दुरुस्तीने सहकारातील सर्वाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. पैशाबरोबरच पाण्याचीही काटकसर करून वापराचे नियोजन भविष्यासाठी करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेचे संस्थापक डॉ. प्रभाकर माळी यांनीही विचार मांडले. अकलूज शाखेचे शाखाधिकारी पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर संचालक शिवाजी गायकवाड यांनी आभार मानले.