* दर दिवशी रेल्वेरुळांवर नऊ जणांचा मृत्यू
मुंबईची ‘लाइफलाइन’ अशी ओळख असलेला रेल्वेमार्ग सध्या मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. २०१३ च्या फक्त पाच महिन्यांत या सापळ्यात १४२५ जणांचा मृत्यू झाला असून १४४६ लोक जखमी झाले आहेत. सरासरीचा विचार केला, तर या वर्षांत रेल्वेमार्गावर दर दिवशी ९ जण मृत्युमुखी आणि तेवढेच लोक जखमी झाले आहेत. मात्र याबाबत रेल्वे प्रशासनाची काहीच चूक नसून प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळेच ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचेही स्पष्ट होत आहे.
मध्य तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील अपघातांवर एक नजर टाकली असता, तुलनेने मध्य रेल्वेवर जास्त अपघाती मृत्यू आणि जखमी होत असल्याचे आढळले आहे. २०१०मध्ये मध्य रेल्वेवरील अपघातांत २३२१ जण मृत्युमुखी आणि २४६७ जण जखमी झाले होते. पश्चिम रेल्वेवर हीच संख्या अनुक्रमे १३८९ आणि १७१६ एवढी होती. गेल्या चार वर्षांत या आकडय़ांत अगदी थोडीशीच घट झाली आहे. यातील ७० टक्के अपघाती मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहेत. तर धावत्या ट्रेनमधून खाली पडून जखमी होणाऱ्यांचे प्रमाण पन्नास टक्क्यांएवढे आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही कारणांवर मध्य तसेच पश्चिम रेल्वेने वारंवार भर दिला आहे. ‘चालत्या गाडीच्या बाहेर लटकू नका’ किंवा ‘रूळ ओलांडण्यासाठी पुलाचा वापर करा’, अशा उद्घोषणा वारंवार करूनही प्रवाशांच्या डोक्यात काहीच प्रकाश पडलेला नाही, हेच या आकडेवारीवरून समोर आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या चार वर्षांत दोन्ही रेल्वेमार्गावरील प्लॅटफॉर्म व गाडी यांच्या पोकळीत पडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४० आहे. याच कारणामुळे जखमी झालेल्यांची संख्या १९१ एवढी आहे. यापैकी काहींना त्यांचे हात-पाय यांसारखे अवयव गमवावे लागले आहेत.
या प्रश्नावर जागरुकता निर्माण करण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. नुकतेच आम्ही एक सुरक्षा अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांनी पुलाचा वापर करावा, गाडीबाहेर लटकू नये, गाडीत चढता-उतरताना काळजी घ्यावी, अशा उद्घोषणा वारंवार केल्या जातात. मात्र तरीही प्रवाशांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. यापुढे प्रवाशांनी अधिक काळजी घेण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.