शहरातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सिंहस्थाच्या कामात व्यग्र असल्याचा लाभ गुन्हेगारांनी घेतला असून शहर पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसू लागले आहे. गुन्हेगार ‘पर्वणी’ साजरी करत असताना पोलीस आयुक्त मात्र सिंहस्थातील सुरक्षा व्यवस्थेत मग्न आहेत. त्यामुळे ज्या आयुक्तांना वर्षभरापूर्वी नाशिककरांनी डोक्यावर घेतले होते, त्यांच्याविरूध्दच आता ओरड सुरू झाली आहे. गुन्हेगारीमुळे नाशिककर त्रस्त झाले असताना पोलीस आयुक्तांचा कठोरपणा कुठेच जाणवत नसल्याचे केविलवाणे चित्र दिसत आहे. पोलिसांनी समाज विघातक शक्तींना मार देण्याऐवजी पोलिसांनाच मार खावा लागत असल्याचे प्रकारही वारंवार घडू लागल्याने नाशिककर चांगलेच हादरले आहेत.

वर्षभरापूर्वी नाशिक शहरात डी. एस. स्वामी, गणेश शिंदे, बाजीराव पाटील यांसारख्या पोलीस अधिकाऱ्यांची फौज कार्यरत होती. या अधिकाऱ्यांनी वारंवार आपआपल्या क्षेत्रात गुन्हेगारांची धरपकड सुरू केल्याने गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले होते. डी. एस. स्वामी यांचा तर गुन्हेगारी वर्तुळातही ‘सिंघम’ म्हणून बोलबाला निर्माण झाला होता. तसाच दरारा शिंदे, पाटील यांनी निर्माण केला होता. स्वामी यांच्या प्रयत्नांमुळे आणि कठोरतेने सिडको, सातपूर परिसराला त्रस्त करून सोडलेल्या टिप्पर गँगचा पुरता बिमोड झाला होता. गुन्हेगारांना वठणीवर आणण्याची त्यांची ष्टाईल नागरिकांना चांगलीच भावली होती. पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांना अशा करारी अधिकाऱ्यांची साथ लाभल्यामुळे नाशिकमध्ये कायदा व सुव्यवस्था असल्याचे दिसू लागले होते. हे सर्व अधिकारी कोणत्याही राजकीय व्यक्तीचा दबाव स्वीकारत नसल्याने गुंडांना संरक्षण देणाऱ्या राजकीय नेत्यांचीही गोची झाली होती.
या कर्तबगार अधिकाऱ्यांच्या जोरावर नाशिकची जनता समाधानात असताना या अधिकाऱ्यांची थोडय़ा थोडय़ा अवधीत बदली झाली. त्यांच्या जागी नवीन अधिकारी आले. नवीन अधिकाऱ्यांना शहरातील गुन्हेगारी विश्व समजून घेण्यास काही कालावधी लागत असल्याने आणि त्यातच सिंहस्थाच्या तयारीवरही अधिकाऱ्यांना लक्ष देणे भाग पडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर असलेली पोलिसांची पकड ढिली झाली. याचा लाभ घेत गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले असून शहराच्या सर्वच भागात गुन्हे घडू लागले आहेत. टिप्पर गँगने सिडकोमध्ये पुन्हा एकदा आपल्या कारवायांना सुरूवात केली असून आतापर्यंत वाहने जाळणाऱ्या या गुंडांनी आता चक्क घराचा दरवाजा जाळण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची हिंमत किती वाढली आहे हे लक्षात येईल. पोलिसांना शहरात कोणीही जुमानत नसल्याचे दिसत आहे. बेशिस्त रिक्षाचालकांना अडविण्याचा प्रयत्न केल्यास वाहतूक पोलिसांना मारहाण करण्याचे प्रकार घडू लागले. पोलिसांनाच जर मार खावा लागत असेल तर आपले काय, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उपस्थित होणे साहजिक आहे.
पोलीस आयुक्तांनी पुन्हा एकदा आपले कठोर रूप गुन्हेगारांना दाखविण्याची अपेक्षा नाशिककर व्यक्त करत आहेत.