News Flash

उन्हाळ्यात ग्राहकांकडून शहाळे व टरबुजाला मागणी

उन्हाची काहीली वाढताच गरज भासते ती थंडाव्याची. सूर्य जसजसा वर येतो जशतशी उन्हाची तीव्रता वाढत जाते आणि बाजारातील टरबूज आणि शहाळ्याकडे पावले वळू लागतात.

| March 27, 2014 10:55 am

उन्हाची काहीली वाढताच गरज भासते ती थंडाव्याची. सूर्य जसजसा वर येतो जशतशी उन्हाची तीव्रता वाढत जाते आणि  बाजारातील टरबूज आणि शहाळ्याकडे पावले वळू लागतात.  ते सर्वात स्वस्त आणि शरीराला लाभदायक आहेत. शहरातील फळांच्या दुकानांमध्ये इतर फळांच्या तुलनेत टरबुजाचे ढीग मोठय़ा प्रमाणावर आढळून येत असून शहाळे विक्रेत्यांच्या गाडय़ासुद्धा गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत.
कोकणची ओळख असलेले शहाळे अलीकडच्या काही वर्षांत सगळीकडे दिसू लागले आहे. पूर्वी कोकणनंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर शहाळाच्या पाण्यातून तहान भागवणारे लोक दिसून यायचे, आता मात्र सगळीकडे शहाळे विकणारे दिसून येतात. आंध्रप्रदेश आणि गुरजातमधून मोठय़ा प्रमाणात शहाळे विक्रीसाठी येत आहेत. बाराही महिने बाजारात दिसून येणाऱ्या शहाळयाला उन्हाळ्यात जास्त मागणी असते. शहाळ्याचे पाणी उष्णतेवर अधिक परिणामकारक असल्याने त्याचा अधिक वापर होत असतो. निव्वळ पाणी असलेले शहाळे बारा रुपये आणि खोबरे असलेले पंधरा रुपयाला मिळते. फळबाजारापेक्षा हातठेल्यावर विक्री करणारे जास्त दिसून येतात.
कस्तुरचंद पार्क मैदानाला लागून असलेल्या फूटपाथवर शहाळ्याची विक्री करणारे दिसून येतात. ही सर्व मंडळी आंध्रप्रदेशमधून आली असून गेल्या दहा वषार्ंपासून केवळ व्यवसायाच्या निमित्ताने नागपुरात स्थायिक झाले आहेत. शहाळ्याचे पाणी पिऊन तहान भागवल्यानंतर त्यातील ओल्या खोबऱ्यांची चव काही न्यारीच असते. हृदयविकार, कावीळ , मधुमेह या व्याधीसाठी अनेक लोक शहाळ्याचा पाण्याचा आणि खोबऱ्याचा उपयोग करीत असतात. विशेषत: कावीळच्या रुग्णांना शहाळ्याचे पाणी पिण्यास सांगितले जाते. शीतपेय, फळांचे रस, टरबूज आणि शहाळ्यांना सर्वानी जवळ केल्याने या फळांची विक्री मोठय़ा प्रमाणात होत आहे. दहा ते पंधरा रुपयापासून मिळणाऱ्या टरबुजांच्या किमती उन्हाच्या तीव्रतेनुसार वाढत जातात. उन्हाळ्याच्या सुटीत सर्व नातेवाईक एकत्र जमल्यानंतर हमखास टरबुजाचा आस्वाद घेत असतात.  बाजारात मिळणाऱ्या इतर शीतपेयापेक्षा टरबुजाचा रस अधिक लाभदायक असतो, म्हणूनच बच्चेकंपनीपासून तर वडिलधारी मंडळीसुद्धा टरबुजांवर यथेच्छ ताव मारतात. सध्या शहरातील विविध भागात टरबुजाची विक्री करणारे दिसून येतात. कॉटन मार्केटमध्ये मोठय़ा प्रमाणात टरबूज विक्रेते दिसून येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 10:55 am

Web Title: increasing demand of fruits in summer season
टॅग : Loksatta,Marathi
Next Stories
1 मदुराई-डेहराडून व चंदीगड-मदुराई एक्सप्रेस ३० मार्चपासून द्विसाप्ताहिक
2 रोख रक्कम बाळगणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांची धास्ती
3 उन्हाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या
Just Now!
X