पहाटेपासून ते मध्यरात्री उशिरापर्यंत सतत सुरू असलेल्या लोकलच्या फेऱ्या..तशात अनेक फलाटांना दोन्ही बाजूला रूळ असल्याने कामासाठी लागणारा आणखी जास्त वेळ..अशा साऱ्या अडचणींमुळे प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत असलेली फलाट आणि लोकल यांच्यातील ती जीवघेणी पोकळी वाढवण्यासाठी न्यायालयाने घालून दिलेली मे २०१५ ही मुदत गाठणे केवळ अशक्य असल्याची हतबलता पश्चिम रेल्वेने व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरूनच गाडी पकडण्याचा-उतरण्याची कसरत करावी लागणार आहे.
उच्च न्यायालयाने फलाटांची उंची ९२० मिमी.पर्यंत वाढविण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी तीन टप्पे ठरवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात ७६० मिमी. उंचीच्या ३२ फलाटांचा समावेश होता. दुसऱ्या श्रेणीत ७६० ते ८४० मिमी. उंचीच्या १६ फलाटांचा समावेश होता. दोन्ही श्रेणीतील फलाटांची उंची वाढविण्यासाठी न्यायालयाने आधी ३१ मार्च २०१५पर्यंतची मुदत दिली होती. नंतर मुदतवाढ देत ३१ मे २०१५ पर्यंत फलाटांची उंची वाढवण्यास सांगण्यात आले. तर तिसऱ्या श्रेणीत ८४० मिमी. उंचीच्या ९७ फलाटांचा समावेश होता. त्यांची उंची वाढविण्यासाठी ३१ मे २०१६ पर्यंतची मुदत आहे. यातील पहिल्या श्रेणीतील ३२ पैकी १७ फलाटांची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित फलाटांचे काम मुदतीत पूर्ण होईल. परंतु उर्वरित दोन श्रेणीतील फलाटांच्या कामाचा प्रस्ताव रेल्वे मंडळाने फेटाळून लावल्याने ती कामे न्यायालयाने घालून दिलेल्या वेळेत पूर्ण करणे कठीण असल्याची हतबलता पश्चिम रेल्वेने व्यक्त केली आहे. उपनगरीय लोकल पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत धावत असल्याने फलाटांची उंची वाढविण्यासाठी केवळ दोन ते तीन तासांचाच वेळ मिळतो. दोन्हीकडून रूळ असलेल्या फलाटाच्या कामासाठी ७५ ते ९० दिवस लागतात. त्यामुळे आखून दिलेल्या मुदतीत ७ ते ९ फलाटांचे काम एकाच वेळी घेणे शक्य नाही, असे पश्चिम रेल्वेचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वेचे मौन
पश्चिम रेल्वेने आपला अहवाल सादर केला. मात्र मध्य रेल्वेने अहवाल सादर केला नाही. ही समस्या लोकांच्या जिवाशी संबंधित असल्याने त्यावर तातडीने कारवाई व्हायला हवी, असे न्यायालयाने सुनावले आहे.