उकाडा वाढला असताना अचानक थंडी वाजून आली आणि काही वेळातच तापाने फणफणलात तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण सध्याचे वातावरणच तसे आहे. उष्ण आणि दमट हवेत विषाणूंची वाढ अधिक प्रमाणात होत असल्याने त्यांच्या संसर्गाची शक्यताही वाढते. त्यातच उन्हाचा ताप कमी करण्यासाठी थंड-अतिथंड पेय अतिप्रमाणात रिचवले जाणे हे संसर्ग अधिक तीव्र करण्यासाठी मदतच करत आहेत. सध्या वातावरणातील उष्मा प्रचंड वाढला आहे. तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. त्यातच समुद्राशेजारी असल्याने आणि पश्चिम दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेत मोठय़ा प्रमाणावर बाष्प आहे. या बाष्पामुळे विषाणूवाढीचा दरही वाढतो. त्यामुळे गेल्या आठवडाभरात अनेकजण सर्दी, तापाने हैराण झाले आहेत. सर्दीसोबतच खोकला, नाक गळत राहणे, कान दुखणे असे आजारही सुरू झाल्याने फॅमिली डॉक्टरांच्या दवाखान्यात गर्दी होत आहे. उन्हामुळे झोप कमी लागणे, पित्ताचा त्रास, डोकेदुखीही काहीजणांच्या वाटय़ा आली आहे. त्यातच रस्त्यावरच्या सरबतांचे ग्लास रिचवल्याने पोटदुखीलाही आमंत्रण मिळाले आहे. रस्त्यावरची फ्रुटज्युस, लिंबूपाणी यामुळे घशात विषाणूसंसर्गासाठी पोषक स्थिती निर्माण होते व टॉन्सिल दुखणे, घसा सूजण असे प्रकार होतात. आजारांची ही साखळी थांबवायची असल्यास उन्हापासून संरक्षण करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे उकाडा घालवण्याचा अट्टाहास करून अतिथंड व दूषित पाण्याची पेय टाळणेही गरजेचे आहे.

हे करा..
घामाच्या धारांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे साधे किंवा माठातले पाणी प्या.
उकाडा घालवण्यासाठी थंड-अतिथंड पेय, पाणी, बर्फ घेऊ नका, त्यामुळे विषाणूसंसर्ग वाढतो.
रस्त्यावर मिळणारी सरबतांमधील दूषित पाण्याने पोट खराब होऊ शकते.
टोपी, छत्री आणि पाण्याची बाटली यांचे वजन होत असले तरी  बाहेर पडताना ते सोबत असू द्या.
पुरेशी झोप घ्या. उन्हामुळे लवकर थकवा येतो. त्यामुळे काही वेळाने आराम करायला विसरू नका.

उन्हामुळे घाम येतो, घामामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डीहायड्रेशन होते, त्यामुळे थकवा येतो व शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. अशावेळी वातावरणातील विषाणू शरीरात गेल्यास संसर्ग होण्याची शक्यता वाढते. विषाणूसंसर्ग झाल्यास त्याचा पहिला प्रभाव म्हणजे सर्दी. त्यानंतर खोकला व ताप येतो.
डॉ. अनिल पाचणेकर