डोंबिवली पश्चिमेत एव्हरेस्ट सभागृहासमोरील रेल्वे फलाटाला लागून असलेल्या चार ते पाच टपऱ्या पालिका आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्तपणे हटवाव्यात. त्यामुळे रेल्वे स्थानकातून पश्चिम बाजूला येणारा मधला पूल मोकळा होईल, अशी मागणी खासदार आनंद परांजपे यांनी आयुक्त शंकर भिसे यांच्याकडे केली आहे. आता प्रवाशांना विष्णुनगर पोलीस ठाणे किंवा द्वारका हॉटेलच्या बाजूकडून रेल्वे स्थानकात प्रवेश करावा लागतो.
या दोन्ही बाजूच्या प्रवाशांच्या गर्दीचा प्रवाह कमी करण्यासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने पश्चिम बाजूला फलाट क्रमांक एकच्या मधल्या बाजूला स्कायवॉकला जोडून एक पूल तयार करून ठेवला आहे. या पुलाने प्रवासी थेट एव्हरेस्ट गल्लीतून पुढे जाऊ शकतील अशी व्यवस्था आहे. डोंबिवली विष्णुनगर तिकीट खिडकी ते पंडित दीनदयाळ चौकापर्यंत एकूण ४६ गाळेधारक रेल्वे फलाटाला खेटून व्यवसाय करीत आहेत. या गाळेधारकांमधील फक्त १५ गाळेधारक अधिकृत आहेत. त्यांना पालिकेने रस्तारुंदीकरणाच्या वेळी पर्यायी जागा देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे, असे खासदार आनंद परांजपे यांनी सांगितले.
त्यामुळे पालिका प्रशासनाने जिन्याच्या मार्गावरील चार ते पाच टपरीधारकांना हटवून पुलाचा मार्ग मोकळा करून प्रवाशांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार परांजपे यांनी आयुक्त भिसे यांना बुधवारी केली.
४६ गाळेधारकांमधील काही गाळेधारक न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे या गाळेधारकांवर कारवाई करता येत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सर्व गाळेधारक अनधिकृत असतील तर रेल्वे व पालिका प्रशासनाने मुंब्रा, कळवा रेल्वे स्थानकांप्रमाणे येथील टपरीधारकांवर कारवाई करून जनतेसाठी रस्ता मोकळा करावा व बंदिस्त जिन्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रवाशांची वाढती संख्या
गेल्या वीस दिवसांत डोंबिवली पश्चिमेतून दररोज ९८ हजार प्रवासी स्थानकात आले. पूर्व भागात १ लाख २० हजार प्रवासी आले. डोंबिवलीत दररोज सरकत्या जिन्यावरून २३ हजार प्रवासी आले. कल्याणमध्ये १९ हजार प्रवाशांनी वापर केला. सकाळी ६ ते रात्रो १० या वेळेत रेल्वे कर्मचाऱ्यांनीच हा सव्‍‌र्हे केला असल्याचे खासदार परांजपे यांनी सांगितले.