उरणच्या द्रोणागिरी नोड औद्योगिक क्षेत्रात केंद्र सरकारचा उपक्रम असलेले सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉपरेरेशन(सी.डब्ल्यू.सी)चे गोदाम आहे. या गोदामाचे काम गेल्या अकरा महिन्यांपासून बंद पडले आहे. त्यामुळे गोदामातील ३७३ कामगारांसह या उद्योगावर आधारित इतर ७०० कामगारांना वेतनापासून वंचित राहावे लागले आहे. या विरोधात बुधवारपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रायगड श्रमिक संघटनेने दिला आहे.
उरणमधील स्थानिक भुमिपुत्रांना पुनर्वसन म्हणून देण्यात आलेल्या नोकऱ्या गमवाव्या लागत असून, गोदाम सुरू करण्याची मागणी केंद्रीय अन्न व नागरीपुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतरही या कामगारांची परवड सुरू आहे. गोदाम सुरू व्हावे याकरिता कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. कंत्राटदार व कंपनी यांच्यात एकमत न झाल्याने गोदाम सुरू होऊ शकले नाही, अशी माहिती रायगड श्रमिक संघटनेचे नेते कॉम्रेड भूषण पाटील यांनी दिली आहे.
या संदर्भात रविवारी जेएनपीटी कामगार वसाहतीच्या बहुद्देशीय सभागृहात सर्व पक्षीय कामगार संघटनांची बैठक घेण्यात आली. या वेळी उरणचे माजी आमदार विवेक पाटील, कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी सी.डब्ल्यू.सी. कामगारांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. सी.डब्ल्यू.सी.ने निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांला सहा वर्षांसाठी काम द्यावे, तसेच अकादास मेरिटाइम या ठेकेदाराने थकविलेल्या एक कोटी ६० हजार रुपयांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करण्याचे आदेश द्यावेत. त्याशिवाय कामगारांचे बोनस, वेतन वाढीतील फरकाची रक्कम, रजा तसेच वैद्यकीय सुविधांच्या थकीत रकमा त्वरित जमा कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिव आकाश भोईर व अध्यक्ष अरुण पाटील यांनी दिली आहे. १५ जुलै रोजी मोर्चा काढून धरणे आंदोलनाला सकाळी ९ वाजता द्रोणागिरी सीडब्ल्यूसी मध्ये सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर १६ जुलैला डिस्ट्रिक्ट पार्क येथे धरणे, २५ जुलै रोजी काम बंद आंदोलन तर १ ऑगस्टला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भोईर यांनी दिली.