भारतीय स्वातंत्र्याचा ६६ वा वर्धापनदिन कोल्हापूर जिल्ह्य़ात उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले.
ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, महापौर प्रतिभा नाईकनवरे, आमदार महादेवराव महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, श्रीमंत शाहू महाराज, जिल्हाधिकारी राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग, गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक विलास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही.एन. सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन. सी. सी. च्या छात्रांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.
महापालिकेच्या वतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर प्रतिभा नाईकनवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, उपायुक्त संजय हेरवाडे, अश्विनी वाघमळे, उपमहापौर परिक्षीत पन्हाळकर, स्थायी समिती सभापती रमेश पोवार, परिवहन समिती सभापती राजू पसारे, महिला व बालकल्याण समिती सभापती सरस्वती पोवार, प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती आशा बराले, सभागृह नेता श्रीकांत बनछोडे, प्रभाग समिती सभापती संजय मोहिते, गटनेता राजेश लाटकर, संभाजी जाधव, सहायक आयुक्त उमेश रणदिवे आदी उपस्थित होते.
महावितरणच्या प्रांगणात परिमंडळाचे मुख्य अभियंता रमेश घोलप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पावसाची संततधार असतानाही विद्युत पुरवठा सुरळीत ठेवून ग्राहकांची सोय केल्याबद्दल २ कनिष्ठ अभियंता, ४ वरिष्ठ तंत्रज्ञ, ५ तंत्रज्ञ, एक वीजसेवक यांचा सत्कार करण्यात आला.
गोकुळ दूध संघाच्या मुख्य कार्यालयामध्ये अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ताराबाई पार्क येथील कार्यालयामध्ये संचालक विश्वास जाधव, गडहिंग्लज येथील संघाच्या शितकरण केंद्रावर संचालक रवींद्र आपटे, तावरेवाडी येथील शितकरण केंद्रावर संचालक दीपक पाटील यांनी ध्वजारोहण केले.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात विभागीय संचालक डॉ. एस. एस. चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहायक कुलसचिव निखील ताम्हणकर, मधुकर बोरसे, संजय काटे, यशवंत पाटील, विजयसिंह रजपूत, विश्वजीत भोसले आदी उपस्थित होते.
गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देशाच्या सीमेवर शहीद झालेल्या वीर कुंडलिक माने आणि सहकारी जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच सौरभ पाटील, स्वरूप पाटील व ऋतुराज इंदूलकर या गुणवंत खेळाडू विद्यार्थ्यांचा प्रत्येकी १००१ रुपये बक्षीस देऊन देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
येथील भाजपाच्या कार्यालयात उपाध्यक्ष दिलीप मैत्राणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी महागाई व भ्रष्टाचाराविरुध्द स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे मत व्यक्त केले. यावेळी अण्णा पिसाळ, नगरसेवक आर. डी. पाटील, किशोर घाटगे, रजनीताई भुर्के, सीमा देवमाने, सुनीता सूर्यवंशी आदी उपस्थित होते.