News Flash

सायबर गुन्ह्य़ांसाठी लवकरच स्वतंत्र उपायुक्त!

राज्यातील पोलीस दलात मोठय़ा प्रमाणात खांदेपालट करताना भाजप-सेना सरकारने सहावे महासंचालकपद तसेच मुंबईत आर्थिक गुन्हे विभागासाठी स्वतंत्र

| April 18, 2015 12:05 pm

राज्यातील पोलीस दलात मोठय़ा प्रमाणात खांदेपालट करताना भाजप-सेना सरकारने सहावे महासंचालकपद तसेच मुंबईत आर्थिक गुन्हे विभागासाठी स्वतंत्र सहआयुक्तपद निर्माण करून कुठलेही पद रिक्त राहणार नाही याची खबरदारी घेतलेली असताना आता वाढलेले सायबर गुन्हे नियंत्रित व्हावेत यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या विभागासाठी आता स्वतंत्र उपायुक्त दिला जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.
आतापर्यंतच्या आघाडी सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा आणि रिक्त पदांचा प्रश्न नेहमीच प्रलंबित ठेवला आणि आपल्या मर्जीतील अधिकारी नेमण्यावर भर दिला. भाजप-सेना सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांचा खांदेपालट करताना वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यावर भर दिला. त्यामुळे सहा महासंचालक नेमले गेले. मुंबईतील आर्थिक गुन्ह्य़ांमध्ये कमालीची वाढ झाली असून आतापर्यंत गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त ही जबाबदारी सांभाळीत होते.
परंतु आता या विभागासाठी स्वतंत्र सहआयुक्तपद निर्माण करून गुन्हे अन्वेषणात माहीर असलेले धनंजय कमलाकर यांची नियुक्ती केल्यामुळे अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सायबर गुन्ह्य़ांत गेल्या काही महिन्यांत कमालीची वाढ झाली आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांनीच चिंता व्यक्त करून हे गुन्हे रोखण्यासाठी तसेच त्यांची उकल होण्यासाठी तातडीने पावले उचलण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्याचाच परिणाम म्हणजे या विभागाची जबाबदारी सहआयुक्त (गुन्हे) यांच्याकडे असली तरी त्यासाठी स्वतंत्र उपायुक्तपद निर्माण करण्याचा पर्याय पुढे करण्यात आला. आता त्यानुसार लवकरच या विभागासाठी उपायुक्ताची घोषणा होणार आहे.

सायबर गुन्ह्य़ांची गेल्या तीन महिन्यांतील आकडेवारी
(कंसात गेल्या वर्षांतील आकडेवारी)
जानेवारी    ६६     (२२)
फेब्रुवारी     ११८     (३७)
मार्च         १६७     (५४)

सायबर गुन्ह्य़ांत वाढ झाली असून त्यांची उकल करण्यात प्रत्येक वेळी यश आले आहे. परंतु येत्या काही वर्षांत सायबर गुन्ह्य़ांत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी स्वतंत्रपणे हाताळणी करणारी यंत्रणा असावी, असे ठरविण्यात आले आहे. सध्या वांद्रे-कुर्ला संकुलात स्थापन करण्यात आलेल्या सायबर पोलीस ठाण्याला गुन्हे दाखल करण्याचे अधिकार आहेत.
-राकेश मारिया, पोलीस आयुक्त, मुंबई.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 12:05 pm

Web Title: independent commissioner for cyber crime
Next Stories
1 आर-दक्षिण प्रभाग समितीच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी
2 मध्य रेल्वेच्या ताफ्यात ३८५ तिकीट तपासनीस दाखल होणार
3 रेल्वे पोलीस आयुक्तांच्या बदलीमुळे नाराजी
Just Now!
X