पंचशताब्दीच्या २२५ कोटीचा विषय संपला असून भूमिगत मलनि:स्सारण गटार योजना व मलनि:स्सारण प्रक्रिया केंद्राच्या कामातील अनियमितता बघता चौकशीसाठी नगरविकास विभागाची स्वतंत्र चौकशी समिती बसवण्याचे व शहराचे भविष्यातील नियोजन लक्षात घेऊन ‘चंद्रपूर शहर विकास आराखडा’ तातडीने तयार करण्याचे निर्देश अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. वैद्यकीय महाविद्यालयासाठी १०० कोटीचा निधी देण्याचेही त्यांनी जाहीर केले.
महापालिकेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. महापौर राखी कंचर्लावार, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, उपमहापौर वसंता देशमुख व स्थायी समिती अध्यक्ष रामू तिवारी यावेळी उपस्थित होते. महापालिकेने राज्य व केंद्राचा निधी मोठय़ा प्रमाणावर वापरून शहराचा विकास करताना ज्या योजनांसाठी निधी मिळतो त्याच योजनांवर पुन्हा राज्याचा निधी वापरू नये अशा सूचना दिल्या. पंचशताब्दीचा विषय संपला असून आता २२५ कोटीचा निधी प्राप्त होणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारने या निधीची घोषणा केल्यानंतर दोन ते तीन वर्षांतच तो द्यायला हवा होता. त्यामुळे शहरातील विकास कामे खोळंबली आहेत. हा निधी खेचून आणण्यात महापालिकेचे अधिकारी कमी पडले. जो २५ कोटींचा निधी दिला तोच अजूनही खर्च झालेला नाही व त्या खर्चाचे विस्तृत विवरण मनपाने सरकारकडे सादर केले नाही. मनपाचे अधिकारी असा भोंगळ कारभार करीत असतील तर विकासाचे काही खरे नाही, असेही ते म्हणाले.
भूमिगत मलनि:स्सारण गटार योजना व मलनि:स्सारण प्रक्रिया केंद्राचे काम ३१ मार्च २०११ मध्येच पूर्ण व्हायला हवे होते. त्यामुळे या कामाच्या चौकशीसाठी नगरविकास विभागाची स्वतंत्र चौकशी समिती नेमणार आहे. या कामाच्या कंत्राटदाराचीही चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे प्रथमत: चंद्रपूर शहर विकासाचा आराखडा तयार करा. तो तयार करताना रस्ते, बगीचा, प्रशस्त सभागृह, वाहनतळ, पिण्याचे पाणी, झोपडपट्टी विकास, क्रीडांगण, चौकाचे सौंदर्यीकरण व वाहतूक व्यवस्था, अशा विविध बाबींचा अंतर्भाव त्यात करावा. मनपाने शहर विकासाचे प्रस्ताव शासनाला पाठवल्यानंतर त्याच्या पाठपुराव्यासाठी नोडल ऑफिसर नियुक्त करावा, अशा सूचना दिल्या. इरई व झरपट नदी विकास करणे आवश्यक असल्याचे सांगून संरक्षण भिंत बांधण्यासाठी प्रस्ताव तातडीने तयार करा. नदीपात्रातील घरांच्या पुनर्वसनासाठी नगरसेवकांना विश्वासात घेऊन तेथील नागरिकांची मते जाणून घ्या, असे ते म्हणाले.
जटपुरा गेट उड्डाणपूल बनवणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य नसल्याचे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शहरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी घेण्याचा मनपाचा मानस योग्य असल्याचे सांगून यासाठी कालबाहय़ साहित्य न घेता इतर विकसित महापालिकेने कुठले आधुनिक साहित्य वापरले का, याचा अभ्यास करा. शहरातील मोकाट कुत्र्यांचा मनपाने त्वरित बंदोबस्त करावा, अशा सूचना दिल्या. मनपाच्या नवीन इमारतीशेजारील शहर पोलीस ठाण्याचे स्थलांतरण करून त्या ठिकाणी प्रशस्त वाहनतळ व्यवस्था उभारता येईल, असेही ते म्हणाले. शहरातील मोक्षधाम विकसित करण्यासाठी मनपाने प्रयत्न करावे, होर्डिगबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, असे सांगून मनपाच्या शाळा अद्यावत व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार नाना शामकुळे व नगरसेवक संजय वैद्य यांनी यावेळी काही सूचना केल्या. मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी मनपातर्फे सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देऊन मालमत्ता करवसुली वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर राखी कंचर्लावार यांनी प्रास्ताविकातून विकासासाठी निधीची अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत नगरसेवकांनीही समस्या मांडल्या.