जगातील विविध पंचांगाना खगोलशास्त्राचा आधार आहे. इजिप्शियन, माया, बॅबीलॉन, ज्युलियन, ग्रेगोरिअन, रोमन, ग्रीक, भारतीय अशा विविध कालमापनाच्या पद्धती जगात अस्तित्वात आहेत. परंतु या साऱ्यांत भारतीय कालगणनेचा प्रभाव समाजाला अधिक नैतिक जीवनाकडे नेणारा आहे. पाश्चात्त्य कालमापन हे सरळ रेषेतील असून चंगळवादी जीवन पद्धतीला जन्म देणारे आहे. वर्तुळाकार कालमापनामुळे कार्यकारण भाव जागृत राहिल्याने नैतिक जीवनाची संधी प्राप्त होते. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे अनेक विचार आजही जागतिक पातळीवर वैशिष्टय़पूर्ण ठरतात, असे मत ज्येष्ठ पत्रकार, तत्त्वचिंतक डॉ. सुभाष देसाई यांनी नुकत्याच भरलेल्या २३ व्या जागतिक तत्त्वज्ञान परिषदेत ग्रीसची राजधानी अॅथेन्स येथे विद्यापीठात व्यक्त केले.     
‘विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ या विषयावरील सभेच्या अध्यक्षस्थानी इका न्यूनिलिटो (फिनलंड) हे होते. डॉ.देसाई यांच्या भाषणानंतर मेक्सिकोचे प्रो.लुझ चापा, कोरियाचे डॉ.इन राचो, रशियाचे नैरा डॅनियन यांनी अभिनंदन केले. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरेही झाली.     
आपल्या भाषणात डॉ.देसाई यांनी जगप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ.स्टिफन हॉकिंग, डॉ.डेव्हिड बोहम, डॉ.जयंत नारळीकर या शास्त्रज्ञांच्या ‘काल’ विषयावरील विचारांची तुलना भागवत, आर्यभट्ट, वराहमिहिर, गौतम बुद्ध यांनी ख्रिस्तजन्मापूर्वी मांडलेल्या ‘काल’ संकल्पनेशी केली आणि ग्रह-दिशा, सूर्य-चंद्र, ग्रहणे व कालमापनाची तुलना करून भारतीय वैचारिक, बुध्दिवादी व शास्त्रीय परंपरेचे वैशिष्टय़ मांडले.    
अॅथेन्स येथे भरलेल्या जागतिक परिषदेला जगभरातून तीन हजार तत्त्वज्ञ, विचारवंतांनी हजेरी लावली होती. समारंभाची सुरूवात दोन हजार वर्षांपूर्वीच्या ‘ओडेयम हेरोउस अॅटीकस’ या प्राचीन स्टेडियमवर झाली तेंव्हा दहा हजार श्रोत्यांनी उपस्थिती लावली होती. सॉक्रेटिस ल्फेटो, ऑरिस्टॉटल या प्राचीन तत्त्वज्ञानींच्या भूमीत भरलेली ही पहिलीच जागतिक परिषद होती, असे डॉ.देसाई यांनी म्हटले आहे.