सरकारच्या अर्थविषयक धोरणांचे परिणाम, आर्थिक तूट भरून काढण्यासाठी वसूल करण्यात येणारे कर आणि नागरिकांच्या आर्थिक स्वातंत्र्यावरील आघात, याबाबत जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे देशस्तरावर ‘अर्थ साक्षरता अभियान’ राबविण्यात येणार आहे. ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदुमाधव जोशी यांनी ही माहिती दिली.
राज्यातील पाच जिल्ह्य़ांत या मोहिमेचा दोन दिवसांचा कार्यक्रम पूर्ण झाला असून यात २५० नागरिकांनी सहभाग घेतला. जोशी आणि प्रा. प्रकाश पाठक यांनी या कार्यक्रमात महागाई आणि सरकारची गेल्या पन्नास वर्षांतील आर्थिक धोरणे याबाबत माहिती दिली.
डिसेंबरअखेर या मोहिमेचा कार्यक्रम राज्यातील सर्व जिल्ह्य़ांत पूर्ण करण्यात येणार असून जानेवारीपासून मोहिम इतर राज्यांतही राबविण्यास सुरूवात केली जाणार आहे.