29 May 2020

News Flash

मेंदू व पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रियेचा भारतीय अविष्कार !

महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाच्या चार शस्त्रक्रियागृहात (ऑपरेशन थिएटर) एकाचवेळी मेंदूच्या चार शस्त्रक्रिया सुरू होत्या..एकाच प्रकारच्या आजारावर वेगवेगळे तंत्र वापरून या शस्त्रक्रिया सुरू होत्या.

| January 9, 2015 01:13 am

महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाच्या चार शस्त्रक्रियागृहात (ऑपरेशन थिएटर) एकाचवेळी मेंदूच्या चार शस्त्रक्रिया सुरू होत्या..एकाच प्रकारच्या आजारावर वेगवेगळे तंत्र वापरून या शस्त्रक्रिया सुरू होत्या. मेंदूपर्यंत पोहचण्यासाठी शस्त्रक्रियागृहातील एका न्युरोसर्जनने नाकाद्वारे प्रवेश केला तर दुसऱ्याने मानेला छेद देऊन मेंदूची शस्त्रक्रिया सुरू केली. तिसऱ्या सर्जनने घशामधून मेंदूकडे पोहोचून आपली शस्त्रक्रिया सुरू केली. एकाच आजारावर चार तज्ज्ञ डॉक्टर वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून शस्त्रक्रिया करत होते आणि केईएमपासून जवळच असलेल्या टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या सभागृहात जगभरातून आलेले पाचशेहून अधिक न्युरोसर्जन त्या शस्त्रक्रिया पाहत होते. एवढेच नव्हे तर त्यावर प्रश्नही उपस्थित करत होते..
न्युरोसर्जनच्या परिषदेच्या निमित्ताने जगात प्रथमच असा प्रयोग झाल्याचे केईएमच्या न्युरोसर्जरी विभागाचे प्रमुख आणि ‘आशिया ओशयन इंटरनॅशनल स्कल बेस सर्जरी कॉन्फरन्स’चे अध्यक्ष डॉ. अतुल गोयल यांनी सांगितले. सलग दोन दिवस मेंदूमधील गाठींवर वेगवेगळ्या तंत्राद्वारे शस्त्रक्रिया सुरू होत्या. पायाचे हाड मोडले असतानाही डॉ. गोयल यांनी एका पायावर उभे राहत यातील तीन शस्त्रक्रिया केल्या. मेंदूवरील शस्त्रक्रिया या अत्यंत जटील आणि खूप वेळ चालणाऱ्या असतात. त्यासाठी जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून अधिक सुटसुटीत प्रक्रिया शोधण्याचे काम सातत्याने चाललेले असते. भारतातील न्युरोसर्जन्सनी त्यातही डॉ. अतुल गोयल यांनी शोधलेले शस्त्रक्रियेचे आविष्कार पाहून जगभरातून आलेले तज्ज्ञ भारावून ते टाटा कॅन्सर रुग्णालयातील सभागृमध्ये टाळ्यांच्या कडकडाटाने दाखवून दिले.
मेंदूच्या विविध आजारांवरील शस्त्रक्रियांमधील भारतीय डॉक्टरांची प्रगती थक्क करणारी आहे. न्यूरोसर्जरीतील (मेंदू शस्त्रक्रिया) जी तंत्रे डॉ. अतुल गोयल यांनी विकसित केली आहेत त्याचा फायदा जगभरातील रुग्णांना होत असून ‘गोयल टेक्निक’ किंवा ‘गोयल प्रोसिजर’ म्हणून जगभर ओळखली जात असून न्युरोसर्जरीच्या पुस्तकात या साऱ्या तंत्रांचा उल्लेख असल्याचे गौरवोद्गार जर्मनीतील ख्यातनाम न्युरोसर्जन डॉ. हेल्मुट ब्रेंटली यांनी काढले. मेंदू तसेच स्पाईन सर्जरीच्या दीडशेहून अधिक प्रोसिजर डॉ. गोयल यांनी विकसित केल्या असून जगभरातील न्युरोसर्जन्स त्याचा वापर करतात. निमित्त होते बाराव्या ‘आशिया ओशयन इंटरनॅशनल स्कल बेस सर्जरी कॉन्फरन्स’चे. जगभरातून पाचशेहून अधिक न्युरोसर्जन या परिषदेसाठी मुंबईत आले असून नऊ जानेवारीपासून ११ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या परिषदेत तज्ज्ञ न्युरोसर्जन्सची लाईव्ह शस्त्रक्रिया, कॅडेव्हर सर्जरी (मृतदेहावरील प्रत्यक्षिक), न्युरोसर्जरीच्या वेगवेगळ्या तंत्रावरील तज्ज्ञांची व्याख्याने, भाष्य, न्युरोसर्जरीतील विद्यमान व भविष्यातील आव्हाने आणि न्युरोसर्जरीमधील क्रांतीवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. थेट शस्त्रक्रियाचे प्रक्षेपण दाखवून आयोजित केलेली ही पहिलीच परिषद असल्याचे डॉ. गोयल यांनी सांगितले. न्युरोसर्जरीच्या क्षेत्रात भारतातील डॉक्टरांनी केलेल्या प्रगतीला जागतिक मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले. या परिषदेमुळे मेंदू तसेच मणक्यांच्या आजारावरील उपचाराला चांगली दिशा मिळेल, असा विश्वासही डॉ. गोयल यांनी व्यक्त केला. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जर्मनी, जपान, इस्रायल अशा अनेक देशांमधून न्युरोसर्जरीमधील तज्ज्ञ या परिषदेसाठी आले आहेत. या परिषदेचे औपचारिक उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते झाले. डॉ. गोयल यांनी सर्वसामान्यांच्या केईएम रुग्णालयात काम करून जी असाधारण कामगिरी केली त्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2015 1:13 am

Web Title: indian doctor invent surgery on brain and backbone
टॅग Brain,Surgery
Next Stories
1 स्थलांतरित अग्निशामकांची कुटुंबे हैराण
2 विद्यार्थ्यांसाठी कल्पकता केंद्र
3 अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार
Just Now!
X