भूकंप तर पाचवीलाच पूजलेला, तशातच त्सुनामी आली, त्यात फुकुशिमा अणुउर्जा प्रकल्पात स्फोट झाला. असे होऊनही जपान आहे तसाच आहे. राखेतूनही उठणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखा! अभ्यासू, जिद्दी, प्रश्नाच्या थेट मुळापर्यंत जाऊन शोध घेणारा..
जपानला भेट देऊन आलेल्या प्रीति अजित कात्रे व तिच्या सहकारी मित्रमैत्रिणींचे हे निरीक्षण आहे. सन २०११ चा प्रलयंकारी भुकंप व नंतर अणुउर्जा प्रकल्पात झालेला स्फोट यामुळे जपानमध्ये किरणोत्सर्ग सुरू असल्याची अफवा जगभर पसरली. त्यातून त्यांची प्रतिमा खराब झाली, पर्यटकांचा ओघ थांबला. तो पुन्हा सुरू व्हावा, अफवा खोटय़ा आहेत, जपान कसा पुर्वीसारखाच आहे हे जगाला दाखवण्यासाठी जपान जगभरच्या युवकयुवतींना युथ एक्सचेंज कार्यक्रमातंर्गत जपानला नेत आहे. त्यात प्रिती कात्रे यांचा समावेश होता.
प्रिती मूळच्या नगरच्या, सध्या त्या पुण्यात वास्तव्यास आहेत. जपानी भाषेच्या त्या अभ्यासक आहेत. देशभरातून १३८ जणांची निवड झाली, त्यात पुण्यातील १५ जण होते व त्यात पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातून प्रीति यांची निवड झाली. टोकियोत ३ दिवस तर फुकुशिमा येथे ७ दिवस त्यांना राहता आले. या कालावधीत त्यांना स्थलदर्शन तर घडवले गेलेच शिवाय व्याख्याने, कार्यशाळा, आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली.
अनेक प्रयोग दाखवण्यात आले. सिम्युलेटेड अर्थक्वेक म्हणजे आभासात्मक भुकंपाचा अनुभवही या पथकाला घेता आला. आपत्ती व्यवस्थापनात इथला प्रत्येक माणूस सक्रिय होतो असे प्रिती यांनी सांगितले. गोंधळ, गडबड न करता शिस्तीत धैर्याने आपत्तीला तोंड कसे द्यायचे याचे रितसर प्रशिक्षणच तिथे देण्यात येते. त्यामुळेच कसल्याही आपत्तीतून ते त्वरीत उभे राहतात. भुकंपात जीवलगांना गमावलेल्या काहींच्या मुलाखती घेतल्या, तशा स्थितीतही ते दुसऱ्यांसाठी कसे काम करत होते ते ऐकून खरोखरच त्यांना सलाम करावासा वाटला असे प्रिती म्हणाल्या.
नगरचे दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते मधूकर कात्रे व श्रीमती सौदामिनी कात्रे यांची प्रिती ही नात आहे. त्यांचे वडिल अजित कात्रे ५ परकीय भाषांमध्ये पारंगत आहेत. त्यांच्यामुळेच परकीय भाषांची ओढ निर्माण झाली, त्यातून जपानला जाता आले. फक्त नैसर्गिकच नाही तर दुसऱ्या महायुद्धाच्या रूपाने या देशावर मानवी आपत्तीही ओढवली. मात्र प्रत्येक वेळी पुन्हापुन्हा उठून उभा राहणारा, सामथ्र्यसंपन्न होणारा जपान जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा वेगळाच आहे असे मत प्रिती यांनी व्यक्त केले.