News Flash

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला बेशिस्तीचे गालबोट

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वागतासाठी जमलेले काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाने केलेल्या नियोजन व्यवस्थेचा बोजावारा उडवत बेशिस्तीचे दर्शन घडवले. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी व निवेदने देण्यासाठी

| April 12, 2013 01:01 am

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वागतासाठी जमलेले काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाने केलेल्या नियोजन व्यवस्थेचा बोजावारा उडवत बेशिस्तीचे दर्शन घडवले. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी व निवेदने देण्यासाठी अक्षरश: धक्काबुकी व ढकलाढकली झाली. यामध्ये ज्येष्ठ पदाधिकारीही मागे नव्हते. ही परिस्थिती पाहून चव्हाण यांनी पोलीस कवायत मैदानावरुन अक्षरश: काढता पाय घेतला.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण शिर्डीहून नगरला आले. नियोजित वेळेनुसार त्यांचे आगमन हेलिकॉप्टरने दुपारी साडेबाराला होणार होते. मात्र ते एक तास उशिरा आले. त्यांच्या समवेत पालकमंत्री बबनराव पाचपुते, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदी होते. हेलिकॉप्टर पोलीस कवायत मैदानावर उतरणार होते, तेथे स्वागतासाठी व निवेदने देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विट्ठलराव लंघे, माजी खसदार दादा पाटील शेळके, माजी आमदार शिवाजीराव नागवडे, केंद्र-राज्य योजना संनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायक देशमुख यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, अतिरिक्त सीईओ रवींद्र पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनिता साळुंखे-ठाकरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई आढावा बैठकीस उपस्थित राहता येणार नसल्याने निवेदने देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणावर पोलीस कवायत मैदानाकडे आले होते. मैदानाच्या बाजुच्या शेडमध्ये, आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना व्यवस्थित मुख्यमंत्र्यांना भेटता यावे, निवेदने स्वीकारता यावीत यासाठी प्रशासनाने व्यवस्था केली होती. दुष्काळ असुनही निवेदनांची संख्या कमी व स्वागताच्या पुष्पगुच्छांची संख्या अधिक होती. मैदानावर हेलिकॉप्टर उतरताच पंख्याच्या वाऱ्याने या खुच्र्याही उलथून पडल्या. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या पुन्हा व्यवस्थित ठेवल्या.
मुख्यमंत्री शेडमध्ये येताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही व्यवस्था कोलमडून टाकत स्वागतासाठी व निवेदने देण्यासाठी एकच झुंबड केली. एकमेकांना ढकलत मुख्यमंत्र्यांजवळ जाण्याचा प्रयत्न केला जात होता. ते पाहुन पाचपुते, थोरात, विखे व पाटील हे चौघेही मंत्री तेथे न थांबताच परस्पर गाडीत जाऊन बसले. ढकलाढकलीचे रुपांतर लगेचच धक्काबुकीत होऊ लागल्याने पोलिसांनी चव्हाण यांच्या भोवती सुरक्षेचे कडे केले. या गोंधळात महिला पदाधिकाऱ्यांचा आवाज चव्हाण यांच्यापर्यंत पोहचत नव्हता. त्या दोन मिनिटे देण्याची मागणी ओरडून करत होत्या. एक-एक जण निवेदन द्या, म्हणणे मांडा असे चव्हाण सांगत होते, मात्र कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांची रेटारेटी सुरुच राहिली. मुख्यमंत्र्यांना तेथे ठेवलेल्या खुर्चीवर बसण्याची संधीही मिळाली नाही, त्यांनी त्या गोंधळातच कोणतीही प्रतिक्रिया न देता, मौन बाळगत त्रासिक चेहऱ्याने, उभ्या उभ्याच निवेदने स्वीकारली व लगेचच तेथून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघून गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 1:01 am

Web Title: indiscipline in welcome to cm
Next Stories
1 शाहू छत्रपतींचा अर्धपुतळा बिंदू चौकात बसविण्याची मागणी
2 पवार-शिंदे असताना पाण्यासाठी न्यायालयीन लढाईची वेळ का?
3 दुष्काळामुळे पावसाच्या भाकिताकडे साऱ्यांचे लक्ष
Just Now!
X