जाहीर सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकला मिळावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी हा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. याचे श्रेय केवळ माझे एकटय़ाचे नसून दिल्लीतील नेत्यांचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
मुंबईला इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न करणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नागपूरकरांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. वनमंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, अॅड यशवंत मेश्राम, बाबा बन्सोड आदी नेते उपस्थित होते. आमदार चंद्रकात हंडोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या जागेवर स्मारक व्हावे यासाठी अनेकांनी निवेदन दिली, आंदोलने करण्यात आली मात्र मधल्या काळात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ही जागा मिळविण्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला देण्याचे आश्वासन दिले होते. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी यांच्या प्रयत्नामुळे गेल्या अनेक दिवसांचे आंबेडकरी जनतेचे असलेले स्वप्न या ऐतिहासिक निर्णयामुळे पूर्ण झाले आहे. डॉ. आंबेडकर स्मारक समितीला साडेबाारा एकर जागा देण्यात आल्यानंतर या जागेवर भव्य स्मारक व्हावे, यासाठी राज्य सरकार अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. डॉ. आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली असून त्यापासून अनेकांना प्रेरणा मिळाली. आपल्या पूर्वजांची स्मृती कायम राहून त्यापासून प्रेरणा घ्यावी यासाठी इंदू मिलच्या जागेवर भव्य असे स्मारक उभे राहणार आहे. कोल्हापूरला शाहू मिलच्या जागेवर शाहू महाराजांचे भव्य असे ऐतिहासिक स्मारक उभे राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. या राज्याला शाहू, फुले, आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला असून त्याचा जगभर प्रचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा अभ्यास करा आणि ज्या ठिकाणी त्यांच्या विचारांची पायमल्ली होत असेल तर त्याठिकाणी संघर्ष करा असे आवाहन चव्हाण यांनी केले. यावेळी माणिकराव ठाकरे आणि पतंगराव कदम यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे संचालन चंद्रकात हंडोरे यांनी केले.