बुधवारी इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहण्याच्या दृष्टीने निश्चित पाऊल पडले. आता यथावकाश तेथे स्मारक उभे राहील. परंतु येथे जे स्मारक उभे राहणार आहे त्याचा मूळ आराखडा तयार करणारे तसेच अशा प्रकारे भव्य स्मारक उभे राहावे, अशी संकल्पना मांडून त्यासाठी उपोषणास्त्र उगारून दलित ऐक्याला चालना देणारे चेंबूरचे नऊ तरूण आज फार कुणाच्या लक्षात नाहीत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक दादरच्या चैत्यभूमीशेजारी उभारण्यासाठी अनेक लढे झाले. पण खरा लढा दिला तो दलित ऐक्यासाठी उपोषणाला बसलेल्या चेंबूरच्या नऊ तरूणांनी! समुद्रामध्ये भरणी करून ५० एकर क्षेत्रावर डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याची त्यांची योजना कालौघात मागे पडली आणि इंदू मिलच्या जागेवर १२ एकरामध्ये स्मारक उभारण्यास सर्व स्तरावर मंजुरी मिळाली. या सर्वच लढय़ामध्ये आघाडीवर होते ते ऐक्यवादी उपोषणकर्ते. मात्र स्मारकासाठी जल्लोष होत असताना आणि नेत्यांमध्ये श्रेयासाठी चुरस लागलेली असताना हे तरूण मात्र दुर्लक्षितच राहिले आहेत. आघाडीवर लढले पण श्रेयासाठी मागेच अशी त्यांची अवस्था आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी समुद्रात ५० एकर भरणी घालून तेथे भव्य स्मारक उभारण्याची योजना १९९५ ते ९८ मध्ये मांडण्यात आली. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचे अनेक प्रयोग सुरू होते. विजय म्हस्के, कैलास आरवडे, राजू घोलप, बाळआसाहेब अहिरे, सुधीर गांगुर्डे, आनंद साबळे, राजू गांगुर्डे, प्रवीण भोसले आणि प्रशांत तोरणे यांनी चेंबूरला १९८९ मध्ये उपोषण केले होते. त्या उपोषणातूनच रिपब्लिकन ऐक्याला चालना मिळाली होती. त्यातूनच भव्य स्मारक उभारण्याची योजना पुढे आली. प्रथम १०० एकर जागेवर हे स्मारक उभारावे असे ठरले होते. मात्र नंतर ते ५० एकर जागेवर उभारावे असे ठरविण्यात आले. या स्मारकाचे संकल्पचित्र तयार करण्यात आले. राज्यातील युती सरकारचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रात भाजपचे सरकार आले तर निश्चित हे स्मारक उभारू, असे आश्वासन या तरुणांना दिले.
समुद्रात उभ्या राहणाऱ्या या प्रस्तावित भव्य स्मारकामध्ये डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा, मोठे ग्रंथालय, बाहेरगावाहून येणाऱ्या आंबेडकर अनुयायांची राहण्याची व्यवस्था आणि फिरण्यासाठी मोकळी जागा असे संकल्पचित्रही त्यावेळी तयार करण्यात आले होते. हे संकल्पचित्र शरद पवार यांना देण्यातही आले होते. आता इंदू मिलच्या जागेवर उभे राहणारे स्मारकही तसेच असणार आहे.
डॉ. आंबेडकर स्मारकासाठी निधी जमविण्यासाठी या तरुणांनी संपूर्ण राज्यात एक भीमरथ फिरवला होता. या भीमरथाच्या माध्यमातून काही निधी या स्मारकासाठी जमविण्यातही आला होता. त्याचवेळी समुद्रात स्मारक उभारण्याच्या योजनेस पर्यावरणवाद्यांनी जोरदार विरोध केला. समुद्र हटविल्यास किनाऱ्यावरील काही गावांना धोका निर्माण होईल, असे सांगण्यात आले होते. तथापि, त्यावेळी विजय म्हस्के आणि त्याच्या काही साथीदारांनी समुद्रकिनाऱ्यावर दगड आणून प्रतिकात्मक भरणीही केली होती. यानंतर राजकारणाच्या लाटेवर हे सगळे आंदोलन मागे पडले आणि तब्बल १५ वर्षांनी पुन्हा या आंदोलनाने जोर धरला. विजय म्हस्के आणि कैलास आरवडे या स्मारकाच्या प्रत्येक आंदोलनात आघाडीवर राहिले. समुद्रात प्रतीकात्मक भरणी घालणारा विजय म्हस्के गेल्या वर्षी इंदू मिलच्या भिंतीवर हातोडा घालण्यासाठीही पुढे होता. पण जेव्हा त्या जागेवर आरक्षण जाहीर झाले आणि स्मारकासाठी जागा देण्याची घोषणा झाली तेव्हा मात्र विजय म्हस्के, कैलास आरवडे आणि त्याचे सहकारी मात्र सर्वांच्याच विस्मृतीत गेले.