अकोल्याचा औद्योगिक विकास खुटण्यामागे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची अनास्था कारणीभूत असल्याची माहिती मिळाली. एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय अमरावतीत असून या कार्यालयामार्फत सतत अकोल्याकडे दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या भागातील औद्योगिक विकास येत्या काळात खुंटण्याची शक्यता अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष द्वारकादास चांडक यांनी व्यक्त केली.
अमरावती प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत पाच जिल्हे आहेत. एकूण ४३ औद्योगिक वसाहती आहेत. त्यापैकी १९ वसाहती या अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्य़ात आहेत. अकोल्यात औद्योगिक क्षेत्र ९१३ हेक्टर असून त्यापैकी ६०८ पेक्षा जास्त उद्योग येथे सुरू आहेत. पाच जिल्ह्य़ांमध्ये सर्वाधिक महसूल अकोला जिल्ह्य़ातून प्राप्त होतो. प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा एका महिन्याचा आढावा घेतल्यास प्रत्येक जिल्हा कार्यालयास भेट, जिल्हा उद्योगमित्र समिती सभा, मुख्य कार्यालयातील कामकाज व सभा, उद्योजकांना भेटण्यास कार्यालयातील उपस्थिती ही महिन्याला केवळ पाच दिवस शिल्लक राहते. त्यात एरिया मॅनेजर हजर नसल्यास किंवा नस्ती उपलब्ध नसल्यास उद्योजकांना एखाद्या लहान कामासाठी अमरावतीला सतत फेऱ्या माराव्या लागतात, तसेच एमआयडीसीचे काम निश्चित कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी असतानाही तसे होताना दिसत नाही, असा आरोप अध्यक्ष द्वारकादास चांडक यांनी केला आहे.
ऑनलाईन काम होत नाही. प्रादेशिक अधिकारी आठवडय़ातून अकोल्यात आल्यास फायनल लिज अ‍ॅग्रीमेंट, एक्झिक्युशन ऑफ अ‍ॅग्रीमेंट, सप्लिमेंट्री अ‍ॅग्रीमेंट, तसेच इतर कामे अकोल्यात पूर्ण करण्याची गरज आहे, पण उद्योजकांना सुविधा देण्यात औद्योगिक विकास मंडळ पुढाकार घेताना दिसत नाही. येथील एमआयडीसीत गेल्या वर्षांपासून कार्यकारी अभियंता नाहीत. त्यांचा अतिरिक्त पदभार खामगाव येथील उप अभियंत्याकडे आहे. त्यामुळे कामांचा खोळंबा होतो, असा आरोप द्वारकादास चांडक यांनी केला. अग्निशमन प्रमाणपत्रासाठी नागपूर गाठावे लागते. अशा विविध समस्या उद्योजकांपुढे आहेत. लहान उद्योगांना स्थानिक स्तरावर फायर प्रमाणपत्र मिळण्याची सोय करण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उद्योजकांच्या समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष द्वारकादास चांडक, उपाध्यक्ष विष्णू खंडेलवाल, विवेक दालमिया, कृष्णा खटोड, संजय अग्रवाल, कैलाश खंडेलवाल यांनी दिला आहे.