विंचूर औद्योगिक वसाहतीमध्ये वाईन व्यतिरिक्त इतर कृषिपूरक व अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी परवानगी देण्याची मागणी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मान्य केल्यामुळे विंचूर परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. याप्रकरणी आ. छगन भुजबळ यांच्यासह शिवसेनेनेही मागणी केली होती.
विंचूर औद्योगिक क्षेत्र हे वाईन उद्योगासाठी राखीव आहे. परंतु या वसाहतीमध्ये अत्यंत नगण्य वाईन उद्योग उभे राहिले आहेत. परिणामी जवळजवळ ६० एकरपेक्षा जास्त जागा पडून आहे. त्यामुळे वाईनव्यतिरिक्त इतर उद्योग या ठिकाणी उभे राहू शकलेले नाहीत. निफाड तालुका हा कृषी क्षेत्रात आघाडीवर असून या भागात फळांचे व फळभाज्यांचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतले जात असल्याने या परिसरातील शेतकरी व कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळण्यासाठी येथे कृषिपूरक व अन्न प्रक्रिया उद्योगांना परवानगी देण्याची मागणी भुजबळ यांच्यासह शिवसेनेचे लासलगाव विभाग प्रमुख शिवा सुरसे यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विंचूर येथील टप्पा क्रमांक तीनमध्ये ४० हेक्टर क्षेत्र कृषिपूरक व अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी देण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यवाही करत असल्याचे भुजबळ यांना कळविले आहे. ही वसाहत वाईन व्यतिरिक्त इतर उद्योगांसाठी खुली होणार असल्याने या परिसराचा औद्योगिक विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवसेनेचे सुरसे यांनी काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाव्दारे गाऱ्हाणे मांडले होते. सर्व उद्योगांना औद्योगिक वसाहतीत समाविष्ट केल्याशिवाय परिसराचा विकास होणे शक्य नसल्याची भावना युवा उद्योजकांकडून व्यक्त करण्यात येत असल्याचे त्यांनी देसाई यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी आ. अनिल कदम हेही उपस्थित होते.
विंचूरच्या औद्योगिक वसाहतीत आघाडी सरकारने केवळ वाइन उद्योगालाच परवानगी दिली होती. त्यामुळे आजपर्यंत या ठिकाणी इतर विशेष उद्योग उभे राहिलेले नाहीत. या क्षेत्राचा विस्तार पाहता आतापर्यंत केवळ नऊ वाइन उद्योग या ठिकणी उभेराहिले आहेत. औद्योगिक वसाहतीत अनेक वर्षांपासून इतर उद्योग उभे न राहिल्याने परिसराचा विकास खुंटला आहे. वाइन उद्योगासाठी वसाहत राखीव असल्यामुळे फळ प्रक्रिया करणारे प्रकल्प व इतर उद्योगांना येथे जागा दिली जात नाही. त्यामुळे अनेक युवा उद्योगजकांनी या ठिकाणी उद्योगासाठी जमीन खरेदी केली असतानाही केवळ वाइन उद्योगासाठी आरक्षित असल्यामुळे त्यांना विंचूर औद्योगिक क्षेत्रात नवीन उद्योगाची उभारणी करण्यात आलेली नाही. या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात लासलगाव, विंचूर, नैताळे, सोनेवाडी, सुभाषनगर, धारणगाव, टाकळी विंचूर, गुंजाळवाडी, निफाड, उगाव, शिवडी, वनसगाव आदी गावे हाकेच्या अंतरावर आहेत. या परिसरात सर्व उद्योगांना समाविष्ट करू शकेल, अशी दुसरी एकही औद्योगिक वसाहत नसल्याने परिसराच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होत आहे. परिसरातील युवा उद्योजकांना प्रगतीची संधी द्यावयाची असल्यास आणि परिसराचा सर्वागीण विकास साधावयाचा असेल तर वाइन उद्योगाचे आरक्षण हटवून ते इतर फळ प्रक्रिया करणारे उद्योग व पूरक उद्योगांसाठी खुले करण्याची मागणी परिसरातील लोकप्रतिनिधीनी केली होती.
वाइनसह इतर उद्योगांना परवानगी दिल्यास या भागातील बेरोजगार तरुणांनाही रोजगार उपलब्ध होण्यासाठी मोलाची मदत होईल ही बाब विभागप्रमुख सुरसे यांनी उद्योगमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. सविस्तर अहवाल मागवून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले होते. शिष्टमंडळात आ. अनिल कदम, बाळासाहेब दराडे, कृष्णा पेखळे, दीपक डुंबरे आदींचा समावेश होता.