News Flash

भोकर येथील रस्त्याचे काम निकृष्ट; तक्रारीला केराची टोपली

भोकरफाटा ते भोकर आंध्र सीमेपर्यंत विशेष महामार्ग प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामावर कोटय़वधी रुपयांचा खर्च झाला आहे.

| July 1, 2013 01:51 am

भोकरफाटा ते भोकर आंध्र सीमेपर्यंत विशेष महामार्ग प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामावर कोटय़वधी रुपयांचा खर्च झाला आहे. पण उद्घाटनापूर्वीच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. भरपावसाळ्यात धो-धो पाऊस सुरू असताना सीताखांडी घाटात डांबरीकरणाचे काम सुरू असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त  होत आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघात राज्य व केंद्र शासनाकडून रस्ते बांधकामासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी खेचून आणला. भोकरफाटा ते आंध्र सीमेपर्यंत विशेष महामार्ग प्रकल्पांतर्गत सुमारे ४० कि. मी. रस्ता आहे. हा रस्ता भोकर विशेष महामार्ग प्रकल्प उपविभाग भोकर अंतर्गत येतो. या रस्त्यावर दीड वर्षांपूर्वी अनुसया कन्स्ट्रक्शनने सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून डांबरीकरणाचे काम केले होते. या कामाची तीन वर्षांची मुदत संपण्याआधीच पुन्हा या रस्त्यावर पल्लवी कन्स्ट्रक्शन, जी. जी. कन्स्ट्रक्शन आदींच्या माध्यमातून सहा महिन्यांपासून पुन्हा काम सुरू आहे. यामध्ये भोकर बायपास रस्त्याचे बांधकाम, भोकरफाटा ते तामसा टी पॉईंट, शहरातील मुख्य भागात रस्ता दुभाजकाचे काम, नाली बांधकाम व रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले. या कामावर सुमारे तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु महिनाभराचा कालावधी संपताच दुभाजक उखडून जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. रस्त्यापेक्षा नालीची उंची अधिक झाल्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर येते. यामुळे वाहनधारकांची मोठी अडचण होते. शहरातील मुख्य चौका-चौकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. काम पूर्ण होण्याआधीच ते उखडून जात असल्याचे चित्र पहावयास मिळते. याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित उपअभियंता गौरीशंकर स्वामी व कंत्राटदार यांच्या तक्रारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केल्या. त्यानंतर त्यांनी संबंधित उपअभियंता व कंत्राटदार यांच्याशी चर्चा करून कामात दर्जा राखावा, अशा सूचना दिल्या. परंतु त्यांच्या सूचनेला कंत्राटदारांनी केराची टोपली दाखवल्याचे रस्त्याच्या दुरवस्थेतून दिसून येत आहे.
भोकर बायपास रस्त्याची निविदा मूळ १२ कोटी ३८ लाख रुपयांची असली तरी हे अंदाजपत्रक जादा दराने मंजूर करून १५ कोटींच्या घरात नेले असल्याची बाबही समोर आली आहे. भर उन्हाळ्यात डांबरीकरणाचे काम करण्याऐवजी पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2013 1:51 am

Web Title: inferior of road work in bhokar dustbin to complaint
टॅग : Ashok Chavan,Complaint
Next Stories
1 मुंडे-पंडित यांचा राजकीय संघर्ष रस्त्यावर
2 खा. वानखेडेंच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर शिवसेनेतील मतभेद चव्हाटय़ावर
3 १ जुलैपासून ऑटोरिक्षांना मीटर
Just Now!
X