डोंबिवलीतील सावरकर रस्त्यावरील महापालिकेच्या वादग्रस्त झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एकूण ३०६ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. २३५ लाभार्थीना सदनिका देण्याचा कार्यक्रम गेल्या वर्षी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या ‘झोपु’ योजनेतील घरांमध्ये अपात्र ठरलेले सुमारे १५ ते २० घुसखोर शिरल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. काही झोपडीदादांनी दहशतीच्या बळावर ‘झोपु’ योजनेतील सदनिका तीन ते चार हजार रुपयांनी बेकायदेशीरपणे भाडय़ाने दिल्या आहेत, अशा तक्रारीही पुढे येत आहेत. २३५ अधिकृत लाभार्थी वगळता अन्य ७१ घुसखोर या इमारतींमधील पाणी, वीजपुरवठय़ाचा अनधिकृतपणे वापर करीत आहेत. या प्रकल्पाला महापालिकेने मालमत्ता कर आकारलेला नाही. २३५ अधिकृत लाभार्थीची यादी प्रारूप आहे. ती यादी अंतिम करण्यात आलेली नाही. येत्या पंधरा दिवसांत या घुसखोरांविरुद्ध पालिकेच्या ‘फ’ प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर आपण पालिकेसमोर अधिकाऱ्यांच्या निषेध म्हणून उपोषण करणार आहोत, असा इशारा या भागातील स्थानिक नगरसेविकेने दिला आहे. ‘फ’ प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी विनायक पांडे म्हणाले, झोपु योजनेतील अनधिकृत प्रकार कमी करण्यासाठी झोपु योजनेचे बाळासाहेब जाधव यांना पत्र दिले आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. यासाठी दुसरे स्मरणपत्र देण्यात आले आहे. दरम्यान, या बेकायदा सदनिकांच्या जोरावर काही झोपडीदादा वर्षांला लाखाची कमाई करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. ७१ सदनिकांमध्ये २० अपात्र घुसखोर बेकायदेशीरपणे शिरले आहेत. उर्वरित ५१ सदनिका येथील स्थानिक दादांनी दहशतीच्या बळावर ५१ भाडेकरूंना तीन ते चार हजार रूपयांच्या भाडय़ाने दिले आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी त्यासाठी घेण्यात आलेली नाही. या भाडेकरूंकडून या भाईमंडळींना लाखोंची कमाई मिळत असल्याचे बोलले जात आहे.