राजीव यांच्या बदलीनंतर मंडळे सोकावली
ठाणे, कळवा, मुंब्रा यांसारख्या शहरांमधील नवे-कोरे रस्ते खोदून गणेश मंडप उभारणाऱ्या मंडळांना प्रत्येक खड्डय़ामागे ५०० रुपयांचा दंड ठोठावून महापालिका नावाची यंत्रणा शहरात अस्तित्वात आहे हे दाखवून देणारे माजी आयुक्त आर. ए. राजीव यांची बदली होताच पुन्हा एकदा काळ सोकावू लागला असून अशाप्रकारे रस्ते खोदणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई करण्याविषयी विद्यमान आयुक्त असीम गुप्ता अजूनही चाचपडत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. राजीव यांनी गेल्या वर्षी केलेल्या कारवाईमुळे अशाप्रकारे खड्डे खोदणाऱ्या मंडळांविरोधात महापालिका यंदा सुरुवातीपासूनच कठोर पावले उचलेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. प्रत्यक्षात राजीव यांची बदली झाल्यामुळे खड्डे खोदणाऱ्या मंडळांना आणखी जोर चढला असून महापालिकेने या मंडळांपुढे गुडघे टेकल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.
रस्ते अडवून वाहतुकीला अडथळा करून उत्सव साजरे करण्यात ठाण्यातील वेगवेगळी उत्सव मंडळे सुरुवातीपासून अग्रेसर राहिली आहेत. दहिहंडी उत्सवात आवाजाचा दणदणाट करायचा, गणेशोत्सवात रस्ते, चौक अडवून मंडपे उभारायची, असे प्रकार ठाणेकरांना नवे नाहीत. ठाण्याचे सत्ताधीश म्हणविणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी शहरातील प्रमुख चौक अडवून गणपती, नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्याचा पायंडा पाडल्यामुळे या पक्षाच्या पावलावर पाऊल ठेवत इतर राजकीय पक्षांनीही उत्सवातील अतिक्रमणाची ही ‘परंपरा’ सुरूच ठेवली आहे. असे असले तरी मंडप उभारताना नव्या-कोऱ्या रस्त्यांवर खड्डे खणले जाऊ नयेत, अशी अपेक्षा सर्वसामान्य ठाणेकर बाळगून होते. ठाणेकरांना चांगले रस्ते मिळावेत यासाठी गेल्या वर्षी महापालिकेने सुमारे २३० कोटी रुपयांचा खर्च करून नवे रस्ते बनविले. काही गणेश मंडळांनी हे रस्ते लागलीच खोदले आणि त्यावर मंडप उभारले. हे मंडप उभारताना त्याकडे डोळेझाक करणाऱ्या महापालिका प्रशासनाला तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या दणक्यामुळे जाग आली. राजीव यांनी प्रत्येक खड्डय़ामागे ५०० रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. शहरातील ५०हून अधिक मंडळांकडून खड्डे खोदल्याप्रकरणी लाखो रुपयांचा दंड गोळा करण्यात आला. राजीव यांच्या दणक्यामुळे यावर्षी मंडळांना शहाणपण सुचेल, अशी अपेक्षा होती. मात्र, महापालिकेला वाकुल्या दाखवत यंदाही सर्वपक्षीय मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डे खणले असून राजीव यांच्या जागी आलेले असीम गुप्ता हे सगळे उघडय़ा डोळ्यांनी पाहात असल्यामुळे बेदरकार मंडळांचे आणखी फावले आहे. या मंडळांवर कोणती कारवाई करायची याविषयी महापालिका वर्तुळात अजूनही पुरेशी स्पष्टता नाही, असे विश्वसनीय वृत्त आहे. राजीव यांच्याप्रमाणे खड्डे खणून झाल्यावर मंडळांवर दंड आकारायचा असे प्रशासकीय वर्तुळात ठरले आहे. मात्र हे खड्डे खणताना मंडळांवर तात्काळ कारवाई केली जात नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. याप्रकरणी आयुक्त असीम गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रश्न विचारताच त्यांचा दूरध्वनी बंद झाला. त्यानंतर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी दूरध्वनी घेतला नाही. याप्रकरणी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी खड्डे खोदणाऱ्या मंडळांना दंड आकारला जाणार आहे, असे स्पष्ट केले. ही कारवाई कधी सुरू केली जाईल, याविषयी त्यांनी ठामपणे सांगण्यास नकार दिला. या मंडळांकडून वसूल केलेल्या अनामत रकमेतून हा दंड वसूल करण्याची तरतूद आहे. त्यामुळे असे खड्डे कोणत्या मंडळांनी खोदले आहेत याची पडताळणी केली जात आहे, असे माळवी यांनी सांगितले.