एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना दुसरीकडे सहा दिवसांवर आलेल्या नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाल्याचे दिसत आहे. शहरातील चितारओळसह विविध भागातील मूर्तीकार दुर्गा देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत. एकीकडे महागाईने जनता त्रस्त झालेली असताना यावर्षी दुर्गादेवीच्या मूर्तींच्या किमतीमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.
चितारओळीत देवीच्या मूर्ती घडविल्या जात आहेत. शहरातील विविध भागातील सार्वजानिक दुर्गादेवी मंडळात वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू झाले आहे. चितारओळ आणि कुंभारपुरा भागात फेरफटका मारला असता अनेक मूर्तीकार दुर्गा देवीच्या मूर्ती तयार करण्यात व्यस्त दिसले. चितारओळीतील मूर्तीकार प्रमोद सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, साधारणत: विघ्नहर्त्यां गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी प्रारंभ होतो. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुर्गादेवीच्या मूर्तीचे भाव ३० टक्कयांनी वाढले आहेत. देवीची मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती, सुतळी, लाकूड, आभूषणे, रंग, तणस आदी वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी १५०० रुपयांपासून ५० हजार रुपयापर्यंत दुर्गादेवीच्या मूर्ती विक्रीला आहेत. गणपतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी जेवढी मेहनत लागत नाही त्यांच्या दुपटीने मेहनत व वेळ दुर्गा देवीची मूर्ती घडविण्यासाठी लागतो. दुर्गादेवीला आभूषणे बरीच चढविली जातात. मध्यप्रदेश, छत्तीसगडसह विदर्भात सावनेर, खापरखेडा, उमरेड, भंडारा, यवतमाळ या ठिकाणाहून मूर्तीची मागणी आहे. शहरात अनेक ठिकाणी दुर्गा उत्सव साजरा केला जातो. दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी जागा बरीच लागत असल्यामुळे जेवढी मागणी तेवढय़ाच मूर्ती तयार केल्या जातात.
शहरातील विविध भागात नवरात्र उत्सवाची तयारी जोमात सुरू झाली आहे.  विविध भागात विविध आकर्षक मंदिरे उभारण्याचे काम सुरू झाले असून स्थानिक  कारागिराशिवाय कोलकाताचे कारागीर रात्रंदिवस काम करीत आहेत. गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवात जसे वातावरण असते तसेच देवीच्या नवरात्र उत्सवात दिसून येते. उज्ज्वल नगर, अभ्यंकर नगर, खामला, सदर, पाचपावली, सीताबर्डी, हनुमाननगर, रेशीमबाग, गोकुळपेठ, रामनगर आदी शहरातील विविध भागात मोठ मोठय़ा मंदिराच्या प्रतिकृती तयार करीत असल्यामुळे ते पाहण्यासाठी भाविकांची गर्दीही मोठय़ा प्रमाणात होत असते. मंदिराच्या प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी काही मंडळात कोलकाता आणि गुजरातचे कलाकार आले आहेत. खामलामध्ये सिंध माता मंडळातर्फे प्रकाश तोतवानी यांच्या नेतृत्वाखाली मथुरातील गोवर्धन पर्वत , उज्ज्वलनगर दुर्गा उत्सव मंडळातर्फे नेपाळचे पशुपतीनाथ मंदिर अभ्यंकरनगरमध्ये विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान जैसमेलमधील जैन मंदिर, अशोकनगरमध्ये तिरुपती मंदिर प्रतिकृती तयार केली जात आहे. लक्ष्मीनगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास असलेले चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.  
  शहरातील विविध देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली असून मंदिराला रंगरंगोटी करण्यात येत आहे. आग्याराम देवी, कोराडी, पारडीतील भवनीदेवी, प्रतापनगर दुर्गा मंदिर, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील रेणुका मंदिरात तयारी सुरू झाली आहे.
कोराडी आणि आग्याराम देवीच्या मंदिरात भाविकांची संख्या पाहता प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. शिवाय शहरातील विविध भागात गरबा उत्सव असल्यामुळे त्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.