२३ एप्रिल हा विख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिन आणि मृत्युदिनही. हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. माहिती-तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात तसेच संगणक, भ्रमणध्वनी आणि दूरचित्रवाहिन्यांच्या आक्रमणामुळे वाचनसंस्कृती धोक्यात आली असल्याची ओरड केली जाते. त्या पाश्र्वभूमीवर वाचनसंस्कृतीत महत्त्वाची भूमिका असलेले ग्रंथपाल, त्यांचे प्रश्न याविषयीचा आढावा, शासकीय ग्रंथविक्री दालनात पुस्तक दिनाच्या पूर्वसंध्येला दिसलेला अनुत्साह तसेच मुंबईतील काही प्रमुख ग्रंथालये आणि त्यांचे सभासदत्व कसे मिळवायचे याची माहिती..
पाठय़पुस्तकांबरोबरच त्याला पूरक असे माहिती व साहित्यमूल्य असलेले अवांतर वाचन मुलांसाठी किती महत्त्वाचे असते हे नव्याने सांगायला नको. म्हणूनच ‘बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करताना शाळेत विविध प्रकारच्या पुस्तकांनी परिपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे ग्रंथालय असावे अशी अपेक्षा करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर अमुक इतकी पुस्तके असल्याशिवाय मान्यता देऊ नये असे शाळा मान्यता निकषांच्या यादीतच नमूद केले आहे. पण, ग्रंथालय हे केवळ पुस्तकांनीच परिपूर्ण होत नाही. त्या पुस्तकांचे योग्य व्यवस्थापन करणाऱ्या ग्रंथपालालाही तितकेच महत्त्व असायला हवे.
आपल्या शाळांमध्ये शिक्षक, प्रयोगशाळा साहाय्यक, लिपिक इतकेच काय तर शिपाईदेखील पूर्णवेळ आहेत. पण, ग्रंथपाल हे असे एकमेव पद असे आहे की जे अर्धवेळ आहे. आणि या ग्रंथपालांची कामे तर काय, शुल्क जमा करून घ्या, विविध प्रकारचे अर्ज भरून घ्या, शिक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या गुणांची गोळाबेरीज करा, वर्गावर कुणी नसल्यास विद्यार्थ्यांना सांभाळा. थोडक्यात वाचनसंस्कृती बालवयातच जोपासणाऱ्या ग्रंथपालांची अवस्था आपल्या शिक्षण व्यवस्थेने ही अशी कारकुनाची करून टाकली आहे.
मुंबईत तर बहुतांश अनुदानित शाळांमधील ग्रंथालयांना ग्रंथपालांअभावी टाळे लागले आहे. चेंबूर, गोरेगाव, पार्ले अशा मराठी टक्का असलेल्या भागातील काही मराठी शाळांमध्ये तर जागेअभावी स्टाफरूममध्ये ग्रंथालयांची कपाटे वसविण्यात आली आहेत. ग्रामीण भागात तर याहूनही गंभीर परिस्थिती आहे. मुंबईतीलच स्वामी विवेकानंद हायस्कूल, महाराष्ट्र विद्यालय, पहाडी क्यू सेकंडरी स्कूल, मुरारराव राणे ज्यु. कॉलेज, रुईया हिंदी हायस्कूल, सेंट थॉमस ज्यु. कॉलेज, अनुदत्त विद्यालाय, एच. के. गिडवाणी हायस्कूल, साधना विद्यालय, मराठी विद्यालय, सावरकर विद्यालय, एअर इंडिया मॉडर्न विद्यालय अशा कितीतरी शाळांमध्ये गं्रथपालच नसल्याने ग्रंथालयांची देखभाल करण्यासाठीच कुणी नाही. त्यामुळे, नवनवीन पुस्तके किंवा तंत्रज्ञान आणून ती अद्ययावत करण्याच्या, मुलांना ग्रंथालयात आणून वाचनाची गोडी लावण्याच्या गोष्टी तर दूरच राहिल्या.
संख्येच्या बाबतीत म्हणायचे तर राज्यातील १८ हजार अनुदानित शाळांपैकी केवळ तीन ते साडेतीन हजार शाळांमध्येच पूर्णवेळ-अर्धवेळ ग्रंथपालांच्या जागा मंजूर आहेत. तर त्यातल्या १०६७ अर्धवेळ ग्रंथपालांना कधीही नोकरीवर पाणी सोडावे लागेल अशी स्थिती आहे. ग्रंथपालांविषयीच्या अनिश्चित धोरणामुळे पूर्णवेळ तर सोडाच अनेक ठिकाणी गरज असून अर्धवेळ ग्रंथपालांच्या जागाही भरल्या जात नाहीत. मुंबईत तर जवळपास २०० हून अधिक शाळांमध्ये ग्रंथपालच नाही. आता दहा दहा वर्षे काम केलेल्या ग्रंथपालांनाही सरकार घरी बसवू लागले आहे. याला कारण संचमान्यतेचे नवे नियम. काही ठिकाणी लेखी सूचना न देता मुख्याध्यापकांवर दबाव आणून ग्रंथपालांची सेवा खंडित केली जात आहे.

ग्रंथपालांचे वेतन शिपायापेक्षाही कमी
खरेतर अवांतर वाचनाची गोडी लावण्यासाठीच नव्हे तर प्रकल्प, व्याख्याने, सादरीकरण, निबंध लेखनासाठी संदर्भ सुचविणे यासाठी ग्रंथपालांची मदत विद्यार्थी-शिक्षकांना होत असते. तसेच, अर्धवेळ ग्रंथपालांना अर्धा पगार मिळत असला तरी काम पूर्णवेळचेच करावे लागते. काही ठिकाणी तर २०-२२ वर्षे सेवा करूनही अर्धवेळ ग्रंथपालांचा पगार शिपायापेक्षाही कमी आहे. या सर्व उदासीनतेमुळे मराठी शाळांमधील वाचनसंस्कृती लोप पावण्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
अनुजा गोखले,
एका शाळेच्या ग्रंथपाल

जाऊ पुस्तकांच्या गावा!
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय
१८९८ला सुरू झालेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला ११७ वर्षांचा इतिहास आहे. आज मुंबईच्या विविध भागांमध्ये या ग्रंथसंग्रहालयाच्या ४४ शाखा आहेत. यामध्ये ६,१५,५६० पुस्तके, तसेच मासिके, केसरीसारखी जुनी वर्तमानपत्रे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मासिक आणि वर्तमानपत्रांसोबत संदर्भसूचीही उपलब्ध आहेत. ग्रंथसंग्रहालयाचे इतिहास संशोधन मंडळ, मराठी संशोधन मंडळ येथे मराठी भाषेवर संशोधनाचे कार्य चालू असते. तसेच शं. ग. दाते सूचीमंडळ येथे नियतकालिकांतील विविध विषयांची लेखसूची करण्याचे काम सुरू आहे. साने गुरुजी बालविकास मंदिरामध्ये लहान मुलांसाठी कामही सुरू असते. यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ग्रंथसंग्रहालयातर्फे ‘बालझुंबड’ या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्याद्वारे १ महिना लहान मुलांना मोफत पुस्तक वाचनाचा आनंद मिळविता येणार आहे.
प्रवेशासाठी : ३०० रुपये नाममात्र रक्कम जमा करून ग्रंथसंग्रहालयाचे सदस्यत्व मिळते. त्यापुढे दरमहा शुल्क ६० रुपये आहे.
 
’ दादर सार्वजनिक वाचनालय
दादर सार्वजनिक वाचनालयामध्ये सध्या १,२५,००० मराठी, इंग्रजी आणि हिंदी विषयांची पुस्तके आहेत. यामध्ये जुन्या तसेच नव्या विविध पुस्तकांचा समावेश आहे. तसेच दर आठवडय़ाच्या मंगळवारी नव्या पुस्तकांची भर वाचनालयात करण्यात येते. त्याची माहिती ईमेलने सभासदांना देण्यात येते. मे महिन्यामध्ये वाढता बालवाचक लक्षात घेऊन २ मे ते १३ मेच्या दरम्यान मुलांसाठी मोफत पुस्तक वाचनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये मुलांना दिवसभर वाचनालयात पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. सोबतच त्यांना पुस्तक विभागामध्ये जाऊन पुस्तकांच्या मांडणीविषयी माहिती करून देण्यात येणार आहे.
प्रवेशासाठी : २०० रुपये नाममात्र रक्कम जमा करून वाचनालयाचे सदस्यत्व मिळते. त्यापुढे दरमहा ६० रुपयांत एका वेळेस एक, तर दरमहा १२० रुपयांत एका वेळेस दोन पुस्तके घरी नेण्याची सोय उपलब्ध आहे.

’ एशियाटिक लायब्ररी
सध्या एशियाटिक लायब्ररीमध्ये २,५०,००० सामाजिक, अर्थकारण, विज्ञान, राजकारण अशा विविध विषयांच्या पुस्तकांचा समावेश आहे. सध्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावरून सभासदांना उपलब्ध पुस्तकांची माहिती देण्यात येते. मे महिन्यात ग्रंथालयात काम करण्यास उत्सुक तरुणांना ग्रंथपाल म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रवेशासाठी: १,५०० रुपये इतके वार्षिक शुल्क असून कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी १५,००० रुपये इतके शुल्क आहे.
 
’ डेव्हिड ससून लायब्ररी
चालू घडामोडींवर आधारित मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती विषयावरील २५,००० पुस्तकांचा संग्रह सध्या वाचनालयात आहे. तसेच १,००० संदर्भग्रंथ आणि १९व्या शतकातील काही दुर्मीळ पुस्तकांचा समावेशही या ग्रंथालयाकडे आहे. ग्रंथालयाच्या बाल्कनीमध्ये पुस्तकवाचनाची सोय उपलब्ध असून त्यासोबतच ग्रंथालयाच्या बाजूच्या मोकळ्या भागात चर्चा, बैठका आदी कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते. तसेच ग्रंथालयाच्या सभासदांचे लेख, कथा यांचा संग्रह असलेल्या मासिकाचे प्रकाशन दर महिन्याला करण्यात येते.
प्रवेशासाठी : सदस्यत्वासाठी ५,००० रुपये इतके वार्षिक शुल्क आहे.
रेश्मा शिवडेकर, मुंबई