महाबळेश्वर पाचगणीत दिवाळीच्या सुटीत होणारी पर्यटकांची व त्यांच्या गाडय़ांपासून होणारी  वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व खात्याच्या अधिका-यांनी दक्षता घ्यावी, नियोजन करावे आणि पर्यटकांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश वाईचे प्रांताधिकारी सूरज वाघमारे यांनी दिले.
लवकरच दिवाळीच्या सुटय़ा सुरू होत आहेत. या वेळी पर्यटकांची मोठी गर्दी होते. बहुसंख्य पर्यटक आपल्या स्वत:च्या वाहनाने येत असतात. याशिवाय अनेक सहलीच्या गाडय़ाही येत असतात. पाचगणी-महाबळेश्वर येथे सर्वच रस्त्यावर वाहतूक कोंडी होते अशा वेळी कित्येक तास पर्यटक या वाहतूक कोंडीत अडकतात आणि पर्यटनाचा आनंद त्यांना लुटता येत नाही व त्यांना भ्रमनिरास होऊन परत फिरावे लागते.
दिवाळी हंगामात पाचगणी-महाबळेश्वर येथे येणा-या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी सातारा जिल्हाधिका-यांच्या निर्देशांनुसार वाईचे प्रांताधिकारी सूरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर पालिकेच्या सभागृहात बठक झाली. या वेळी तहसीलदार अतुल म्हेत्रे, नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, मुख्याधिकारी सचिन पवार वनक्षेत्रपाल खोत, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.
पर्यटकांना सर्व खात्यांच्या अधिका-यांनी विशेष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, त्याचा प्रवास सुखकर व्हावा, वाहतुकीचे नियोजन करताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही सूरज वाघमारे यांनी दिल्या.