सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा रब्बी हंगामासाठी एकूण ५९६ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असताना जेमतेम तीन कोटी एवढेच पीक कर्ज वितरीत केले आहे. त्यामुळे सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी जिल्हा बँकेला पीक कर्ज वाटपाच्या लेखी सूचना दिल्या आहेत.
    यंदा जिल्हयात सर्वत्र समाधानकारक पडलेल्या पावसामुळे शेतकरीवर्ग मोठया प्रमाणात रब्बी हंगामामध्ये पिकांची लागवड करीत आहे. यात ऊस पिकाला प्राधान्य दिले जात आहे. रब्बी हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला ५९६ कोटींचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. परंतु त्यापकी केवळ तीन कोटी एवढेच कर्ज या शेतक-यांच्या समजल्या जाणा-या जिल्हा बँकेने वितरित केले आहे. ग्रामीण बँकेनेही ५७ कोटींच्या उद्दिष्टापकी केवळ दोन कोटी ९७ लाखांचे कर्ज रब्बी पिकांसाठी वाटप केले आहे. तर राष्ट्रीयीकृत बँकाही पीक कर्ज वाटपात मागे आहे. एकूण ७३५ कोटी कर्जाच्या उद्दिष्टापकी फक्त ५९ कोटी १२ लाखांचेच कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतक-यांना वाटप केले आहे.
    आतापर्यंत आर्थिकदृष्टय़ा भक्कम समजल्या जाणा-या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने अलीकडे सहकारी व खासगी साखर कारखाने, अभियांत्रिकी शिक्षण संस्थांना वारेमाप कर्ज वाटप केले होते. परंतु यापकी सुमारे दोन हजार कोटींचे कर्ज थकीत असल्याने ही बँक अडचणीत आली आहे. त्यामुळे शेतक-यांना पीक कर्ज देणे जवळपास थांबविण्यात आले आहे. तथापि, पीक कर्ज वितरीत होण्यासाठी काही लोकप्रतिनिधी व शेतक-यांनी मागणी करून पाठपुरावा सुरू केल्यामुळे अखेर जिल्हा उपनिबंधक लावंड यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेला पीक कर्ज तातडीने वाटप करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत.