विविध राज्यांमध्ये २३ संस्थांमार्फत तंत्रशिक्षण राबविणाऱ्या नामांकित एमआयटी समूहाने अँड्रॉइड अॅप्स प्रदर्शित केले आहे. अॅप्सचे नाव ‘एमआयटी औरंगाबाद’ असून, जगभरातील १३६ देशांमधील २ हजार ५७९ प्रकारच्या टॅब्लेट्स, अँड्रॉइड फोनसाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये ते मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे एमआयटी समूहाबाबत सविस्तर माहिती सर्वाना घरबसल्या मिळणार आहे.
एमआयटीचे महासंचालक प्रा. मुनीष शर्मा, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर गोगटे, एमसीए विभागप्रमुख डॉ. चित्रा देसाई, प्रा. बी. एन. क्षीरसागर, प्रा. प्रवीण देशमुख, प्रा. सुरेश गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते. प्रा. शर्मा म्हणाले, की नजीकच्या काळात अँड्रॉइड अॅप्सद्वारा व्हच्र्युअल लर्निगची सुविधा विद्यार्थ्यांसाठी निर्माण करणार आहे. ज्यामार्फत प्राध्यापकांचे व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, सादरीकरण स्मार्ट फोनमार्फत पाहता येतील. गेल्या वर्षांपासून एमआयटी व आयआयटी (मुंबई) यांनी संयुक्तरीत्या डॉ. चित्रा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व प्राध्यापकांना आकाश टॅब्लेट्स वापरून अँड्रॉइड   ऑपरेटिंग   सिस्टमचे प्रशिक्षण दिले जात आहे. अँड्रॉइड अॅप्सची निर्मिती करण्यासाठी ‘अॅप्स डेव्हलपमेंट सेंटर’ची उभारणी करण्यात आली.