विकासाची धुळवड- १ , शीळफाटा परिसर
* सेकंड होमचा वाढता ट्रेंड
* नगरे नेत्रदीपक पण, समस्या नजरेआड
* वाहतुकीवर येणार ताण
* नागरी सुविधांबाबत शासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हौशी खवय्यांसाठी ढाब्यांवरील जल्लतदार मेजवानीचे ठिकाण अशी काल-परवापर्यंत ओळख मिरविणारा शीळफाटा, मुंब्रा परिसराचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या नागरीकरणामुळे पूर्णत: बदलू लागला असून, ढाब्यांच्या गावांपुरता ओळखला जाणारा हा परिसर आता बडय़ा बिल्डरांच्या ‘टाऊनशिप’चे केंद्र बनू लागला आहे.   
डोंबिवली परिसरातील २७ गावे, शीळफाटा, मुंब्रा (पारसिक बोगदा), दिवा या १५ ते २० किलोमीटरच्या परिसरात विविध बांधकाम कंपन्यांचे सुमारे १५ ते २० भव्य गृहनिर्माण प्रकल्प आकाराला येत आहेत. वरवर वाटणाऱ्या मंदीच्या काळातही या बांधकाम प्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रमाणात नोंदणी करून सेकंड होम, हॉलिडे होम घेण्याचा ट्रेंडही झपाटय़ाने वाढीस लागला आहे. या विकासामुळे येथील जुन्या गावक ऱ्यांचे डोळे दिपत असले तरी भविष्यात येणाऱ्या काही नागरी प्रश्नांच्या वादळांची चाहूलही या विकासाच्या वावटळीत घोंघावू लागली आहे.
मुंब््रय़ाच्या डोंगरावरून दूरवर नजर मारली तर दृश्य नजरेस पडते ते म्हणजे २० किलोमीटरच्या परिसरात नवीन शहरच वसविले जात असावे असे. या गृहनिर्माण प्रकल्पात शेकडो मजुरांना काम मिळाले आहे. परस्परावर अवलंबून असणारे लहान-मोठे उद्योग-व्यवसाय या बांधकामांमुळे तेजीत आहेत. स्थानिक पातळीवर वाहतूक, मजुरीच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. नवे विकासक ही शहरे उभी करीत आहेत. शंभर एकरपेक्षा अधिक जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प उभारणीस शासनाने, एमएमआरडीएने मंजुऱ्या दिल्या आहेत. स्वतंत्र अशा भल्या मोठय़ा टाऊनशिपच्या धर्तीवर या भागाचा विकास सुरू आहे. येथील काही मोठे गृहप्रकल्प येत्या चार ते पाच वर्षांत पूर्ण होतील. सध्या या भागातील लोकसंख्या सुमारे चार ते पाच लाखांच्या घरात आहे. नव्याने होणाऱ्या या विकासामुळे ही लोकसंख्या दुपट्टीने वाढणार आहे. त्यामुळे याठिकाणी आवश्यक अशा पायाभूत सुविधा उभ्या करण्याचे आव्हान एमएमआरडीए, महापालिका, स्थानिक प्राधिकरणांना पेलावे लागणार आहे. विकासकाने या प्रकल्पातील रहिवाशांसाठी रेल्वे, बस आगारापर्यंत अंतर्गत प्रवासी वाहतुकीची सुविधा केली असली तरी ती शेवटपर्यंत टिकेलच याची खात्री नाही.
डोंबिवली, मुंब्रा, दिवा रेल्वे स्थानकापासून हे प्रकल्प तसे लांब अंतरावर आहेत. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्थेचा नव्याने विचार करावा लागणार आहे. सध्या तरी तो होताना दिसत नाही. प्रकल्प उभारणीची मंजुरी देत असताना पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काय, असा प्रश्न आतापासूनच निर्माण झाला आहे. आवश्यक नागरी सुविधा देण्यास सध्याची शासकीय यंत्रणा सक्षम आहे का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. पाणीपुरवठय़ाचे व्यवस्थापन हा ठाणे जिल्ह्य़ाला भेडसावणारा मोठा प्रश्न आहे. नव्याने उभ्या राहणाऱ्या या वसाहतींसाठी पाण्याचे व्यवस्थापन नव्याने करावे लागणार आहे. रस्ते, वीज, पाणी, वाहतूक असे अनेक प्रश्न या नव्या विकासामुळे निर्माण होणार आहेत. याचा प्राधान्याने विचार होणे आवश्यक आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येते.
या सगळ्या विकासाचा ताण कळत-नकळत डोंबिवली, कल्याण, ठाणे, मुंब्रा शहरांवर पडणार आहे. येथील पालिका प्रशासनाला या शहरांमध्ये सुविधा पुरविताना घाम फुटला आहे. असे असताना नव्याने होणाऱ्या या विकासाचा भार कुणी पेलायचा, असा प्रश्न  प्रसिद्ध वास्तुविशारद व या भागातील रहिवासी संदीप पाटील यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना उपस्थित केला. शीळ-दिवापट्टय़ात नागरीकरणाने जसा वेग धरला आहे, त्याच प्रमाणात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामांची उभारणी सुरू आहे. त्यावर कोणत्याही प्रशासनाचे नियंत्रण नाही. या बांधकामांचा भारही येथील पायाभूत सुविधांच्या व्यवस्थापनावर पडू लागला आहे.(क्रमश:)

शहरीकरणाचे वादळ
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांच्या परिघावरील भागात मोठमोठे नवे गृहनिर्माण प्रकल्प आकाराला येत आहेत. या प्रकल्पांमुळे ठाणे जिल्ह्य़ातील नागरीकरणाचा वेग झपाटय़ाने वाढत आहे. एकेकाळी आगरी, आदिवासीबहुल असणाऱ्या या जिल्ह्य़ाचा चेहरामोहरा आता नव्याने उभ्या राहाणाऱ्या गगनचुंबी अशा या संकुलांमुळे बदलू लागला आहे. हा चेहरा देखणा दिसला तरी या विकासाच्या अंतरंगात रस्ते, वीज, पाणी, वाहतूक असे अनेक प्रश्न आहेत. त्यांचा आवाका किती मोठा असेल, अशी चिंता नियोजनकर्त्यांनाही सतावू लागली आहे. नागरीकरणाच्या या जंजाळात निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा हा धांडोळा या सहा भागांच्या मालिकेमधून घेण्यात आला आहे.