31 October 2020

News Flash

सावेडी रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम

नगर-मनमाड (सावेडी) रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांचे तातडीने सर्वेक्षण करून त्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

| July 13, 2013 01:40 am

 नगर-मनमाड (सावेडी) रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांचे तातडीने सर्वेक्षण करून त्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. येत्या एक, दोन दिवसात सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना मनपा आयुक्त विजय कुलकर्णी यांनी दिल्या.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये मनपाने ही मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळेच या राज्यमार्गावरील अनेक बडय़ा धेंडांचेही धाबे दणाणले आहे. या रोडवरील व्यावसायिक शरद क्यादर यांनी या राज्यमार्गाला खेटूनच बेकायदेशीर बांधकाम केल्याबद्दल मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने त्यांना मोटीस बजावून कारवाई सुरू केली होती. त्याला क्यादर यांनी येथील न्यायालयात आव्हान दिले असता न्यायालयाने मनपाच्या बाजूने निकाल देऊन त्यांचे बांधकाम अतिक्रमण असल्याचेच मान्य केले. या निकालाला क्यादर यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. तेथेही त्यांच्या विरोधात निकाल झाला, मात्र उच्च न्यायालयात जाण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली होती.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्यादर यांनी याबाबतचे अनेक दाखले सादर केले. शहरातून जाणारा हा राज्यमार्ग पूर्णपणे व्यावसायिक आहे. त्यावर अनेकांची अतिक्रमणे असताना मनपा व्यक्तिगत आकसातून केवळ आपल्यावरच कारवाई करीत असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले असता खंडपीठाने नगररचना विभागाचे सहायक संचालकांना यावर ४ आठवडय़ात निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या राज्यमार्गावरील सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून अतिक्रमणांबाबतचा अहवाल ६ आठवडय़ात सादर करण्याचा आदेश मनपाला दिला आहे. या सर्वेक्षणात आढळून येणा-या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे.
या पार्श्र्वभूमीवर मनपाचे आयुक्त यांनी आज तातडीने संबंधित विभागांची बैठक घेऊन याबाबतचे कडक आदेश दिले आहेत. नगर-मनमाड राज्यमार्गावरील पत्रकार चौक ते मनपा हद्दीपर्यंतच्या इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. एकीकडे हे सर्वेक्षण सुरू असतानाच आढळून येणा-या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याची जबाबदारी प्रभाग अधिका-यांवर सोपवण्यात आली आहे. नागरिकांनी या मोहिमेत मनपाला सहकार्य करावे, अतिक्रमणे स्वत:हून काढून घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 1:40 am

Web Title: infringement move away campaign on savedi road
Next Stories
1 पन्हाळगड-पावनखिंड पदभ्रमंतीला प्रारंभ
2 बार्शीत सराफाला २५ लाखांचा गंडा घालणा-या व्यापा-यावर गुन्हा
3 बेकायदा वाळू उपशाप्रकरणी कडक कारवाईची मागणी
Just Now!
X