येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त समारंभ शनिवार ९ मार्च रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. या समारंभात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ज्ञ पद्मविभूषण डॉ. बी. के. गोयल आणि ज्येष्ठ अणुसंशोधक पद्मश्री शिवाराम भोजे यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) ही सन्मानपूर्वक पदवी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय डी. पाटील आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एच. पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.    
डी. वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडीच्या आवारात हा समारंभ होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले, डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाची कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी स्वतंत्र विद्यापीठे आहेत. कोल्हापुरातील या विद्यापीठाची स्थापना सन २००५ साली झाली आहे. सातत्यपूर्ण व उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा पुरविल्याबद्दल केंद्र शासनाच्या मानव विकास संसाधन मंत्रालय व यूजीसीच्या मान्यतेने या शिक्षण संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. स्थापनेनंतर विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात भरीव योगदान दिले. याची दखल घेत २०१२ साली विद्यापीठास नॅकच्या वतीने ‘ए’ ग्रेड मानांकन देण्यात आले. विद्यापीठांतर्गत डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून एम. बी. बी. एस., एम. डी., एम.एस., फिजिओथेरपी आदी अभ्यासक्रम चालविले जातात. नर्सिग महाविद्यालयात बी.एस्सी नर्सिग, पी.बी.बी.एस्सी. नर्सिग तसेच एम.एस्सी नर्सिग हे अभ्यासक्रमही चालविले जातात. आंतरशाखीय केंद्राच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन व पीएच.डी शोधप्रबंध मान्यताप्राप्त संस्थांच्या मान्यतेने सादर केले जातात.    
विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षान्त समारंभात विविध अभ्यासक्रमातील ३५६ स्नातकांना पदवी दिली जाणार आहे. तसेच यातील १५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके दिली जाणार आहेत. विद्यापीठातील पहिली पीएच.डी.धारक अश्विनी साळुंखे हिचा दीक्षान्त समारंभाप्रसंगी सन्मान करण्यात येणार आहे. या समारंभासाठी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कुलपती डॉ.विजय भाटकर यांच्यासह व्यवस्थापन मंडळाचे सर्व सदस्य, अधिष्ठाता तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.    
पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक ए. सी. पोवार, वित्त अधिकारी श्याम कोले आदी उपस्थित होते.