शाळेच्या जुन्या विद्यार्थ्यांपैकी काही अवलिये एकत्र येतात, हरवलेल्या बालमित्रांना शोधून शाळेच्या आवारात पुन्हा एकदा भेटण्याचे कार्यक्रम ठरतात आणि मग परत सर्व पाखरे आपापल्या वाटेला निघूनही जातात, पण अशाच एका शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनामध्ये दहा मैत्रिणींची भेट झाली आणि त्यातून शहरातील वाढता प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी आपल्यापरीने एक प्रयत्न म्हणून घरातील शिल्लक ओढण्यांपासून कापडी पिशव्या तयार करण्याची संकल्पना त्यांना सुचली आणि त्या तयारीला लागल्या. अर्थात, या तयार पिशव्या केवळ स्वत:साठी न ठेवता, शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

एका महिन्यापूर्वी मुलुंडच्या एन. जी. पुरंदरे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन भरवण्यात आले होते. त्यामध्ये पेशाने शिक्षिका विभावरी दामले यांची भेट जुन्या मैत्रिणींशी झाली. कार्यक्रमाच्यावेळी प्लास्टिकच्या वाढत्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी ओढण्यांपासून पिशव्या तयार करण्याची आपली कल्पना विभावरी यांनी आपल्या मैत्रिणींना बोलून दाखविली. त्यांनाही ती आवडली आणि त्यातून ‘आपली सखी’ हा त्यांचा गट तयार झाला. रोज भाजी, पूजेची फुले आणण्यासाठी आपण सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करतो. त्याऐवजी या पिशव्या लोकांना वाटल्यास काही प्रमाणात का होईना, प्लास्टिकच्या पिशव्यांना आळा बसू शकेल, असा त्यांचा यामागचा उद्देश होता. आकाराने छोटय़ा असल्यामुळे या पिशव्या सहजपणे पँटच्या खिशात किंवा पर्समध्ये मावू शकतात. त्यामुळे घरातली पुरुष मंडळीही या पिशव्या त्यांच्याकडे बाळगू शकतात, असे विभावरी सांगतात. घरात प्रत्येकीकडे जुन्या ड्रेसची एखादी तरी वापरात न येणारी ओढणी असतेच, एका ओढणीपासूनच २० ते २५ ओढण्या सहज बनतात. त्यामुळे कमी खर्चीक आणि घरच्याघरी या पिशव्या तयार करता येतात. सध्या तरी प्रत्येकीने किमान २५ पिशव्या तयार करण्याचा निश्चय केला, पण हा प्रयोग फक्त स्वत:पुरता मर्यादित न ठेवता, व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नातेवाईक, मित्रमैत्रिणी, ऑफिसमधील सहकारी यांना या उपक्रमाची कल्पना दिली आणि त्यांना पिशव्या पुरविण्याचे आवाहन केले आहे. सध्या त्या लोकांकडून या पिशव्या गोळा करत असून लवकरच त्याचे वाटप शेजारी, भाजीविक्रेते, मंदिरांमधील फूलविक्रेते यांना करण्यात येणार आहे. आपल्यापरीने आपल्या परिसरातील लोकांमध्ये या पिशव्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न त्या करणार आहेत.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनामध्ये दहा मैत्रिणींची भेट झाली आणि त्यातून शहरातील वाढता प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी आपल्यापरीने एक प्रयत्न म्हणून घरातील शिल्लक ओढण्यांपासून कापडी पिशव्या तयार करण्याची संकल्पना त्यांना सुचली आणि त्या तयारीला लागल्या. अर्थात, या तयार पिशव्या केवळ स्वत:साठी न ठेवता, शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे..