दीपावलीच्या काळात शहरालगतच्या पाथर्डी शिवारात दरोडेखोरांनी चढविलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले एकनाथ कचरु मोरे (६५) यांचे मंगळवारी पहाटे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. या हल्ल्यात मोरे कुटुंबातील माय-लेक जागीच
ठार झाले.
पालिका हद्दीतील पाथर्डी शिवाराचा बहुतेक भागात शेती आहे. पाथर्डी- गौळाणेकडे रस्त्यावरील मोंढे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी मोरे यांच्या घरात प्रवेश करून हल्ला चढविला होता. तत्पुर्वी, आसपासच्या वस्त्यांवरून प्रतिकार होऊ नये म्हणून त्यांनी काही घरांना आधीच बाहेरून कडय़ा लावल्या. यावेळी दरोडेखोरांनी राजश्री संपत मोरे (३५), त्यांचा मुलगा अनुज संपत मोरे (१०), सासरे एकनाथ कचरू मोरे (६५) आणि सासू हिराबाई एकनाथ मोरे (६०) यांना तिक्ष्य हत्यारांचा सहाय्याने बेदम मारहाण केली. त्यातच राजश्री मोरे व त्यांचा मुलगा अनुज यांचा मृत्यू झाला तर सासू-सासरे गंभीर जखमी झाले होते. संपत मोरे हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले असताना त्यांचे संपूर्ण कुटुंब दरोडेखोरांच्या हल्ल्यात सापडले. गंभीर जखमी झालेल्या एकनाथ मोरे व हिराबाई मोरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी एकनाथ मोरे यांचे निधन झाले.
या घटनेमुळे आधीच शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बुलढाणा येथील भिका पिराजी चव्हाण, नारायण सीताराम चव्हाण, भोप्या पवार, सुरेश व्यंकट चव्हाण, सुधाकर पुंडलीक चव्हाण या सहा संशयितांना अटक केली. त्यानंतर त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. या कोठडीची मुदतही वाढविण्यात आली. पाथर्डी येथील दरोडय़ाची घटना मनमाडच्या नागापूर येथे घडलेल्या घटनेशी साधम्र्य साधणारी असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. पोलीस तपासात संबंधितांकडून कोणकोणत्या बाबींची उकल झाली याची स्पष्टता झाली नसली तरी मोरे कुटुंबावर आणखी एक आघात कोसळला.