शरद कोशिरे यांचा आरोप
महापालिकेतील सत्ताधारी मनसेने वर्षभराच्या कामकाजात मराठी मक्तेदारांना डावलण्याचे काम केले असून परप्रांतीय कंपनीला एलईडी बदलण्याचे ७० कोटीचे काम २०४ कोटी रुपयांमध्ये देऊन १३४ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी केला आहे.
‘मिशन २०१४’ अंतर्गत शहर राष्ट्रवादीने प्रभागनिहाय बैठका सुरू केल्या असून प्रभाग क्र. २७ ची बैठक गुजरात समाज मंदिरात कोशिरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. पालिकेत मनसेची सत्ता येऊन एक वर्ष झाले. परंतु स्वच्छता, घंटागाडी, डासांचे साम्राज्य यावर काहीच उपाय योजले नाहीत. कुंभमेळ्याची कामे सुरू नाहीत. मनसेचे तीन आमदार असले तरी कामे शून्य आहेत. प्रभाग अध्यक्षांनी महापालिकेच्या समस्यांबाबत आयुक्तांना निवेदन द्यावे, काम न झाल्यास आंदोलन करावे, असे आवाहनही कोशिरे यांनी केले. प्रभाग अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी प्रभागाच्या समस्या मांडल्या. गणेश तांबे यांनी घंटागाडी व अस्वच्छतेत अनियमिततता होत असल्याची तक्रार करत मनसे पालिकेत अपयशी ठरल्याचे नमूद केले. विशाल गवांदे यांनी प्रभागात उद्यान करण्याची मागणी केली. वाया जाणारे नळाचे पाणी रोखावे, डासांचे  वाढते साम्राज्य, फवारणीकडे दुर्लक्ष, तिवंधापासून ते तांबटलेनपर्यंत सार्वजनिक मुतारीचा अभाव, व्यायामशाळांमध्ये साहित्याची कमतरता, उर्दू शाळेजवळ अस्वच्छता, अशा समस्या मांडल्या. अमोल साळी यांनी पालिकेचे कर्मचारी गैरहजर राहून बाहेरील कामगारांकडून काम करून घेत असल्याचा आरोप केला. बडी दर्गा, मुलतानपुरा हा भाग अस्वच्छतेचे माहेरघर असल्याची तक्रार त्यांनी केली. बलम पटेल, दिनेश चव्हाण यांनीही समस्या मांडल्या.