नवप्रवर्तन आणि उद्योजकता ही जीवनाच्या यशाची किल्ली आहे. वेस्टमधून वेल्थ निर्माण करता येणे महत्त्वाचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यावर आपल्या आवडीनिवडी न लादता मुलाला त्याच्या आवडीचे काम करू द्यावे. नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. तुळशीबागेतील सी.पी. अ‍ॅन्ड बेरार महाविद्यालयात नुकताच ‘यशोगाथा’ पुस्तक प्रकाशन आणि नवप्रवर्तक उद्योजक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या यशस्वी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. किशोर डागा, हेमंत काळीकर, लोकमन गंगोत्री, मंदार तुळणकर, विवेक देशपांडे, नरेंद्र जोग, गौरव सव्वालाखे, संदीप बारस्कर, अभिजित गान, विवेक रानडे, गिरीश काठीकर, संतोष प्रधान, श्रीनिवास वर्णेकर, जयसिंग चौहान आणि ललिता पुराणिक उपस्थित होते. देशात ७२ टक्के तरुणांची संख्या आहे. त्या तरुणांकडून अशा प्रकारच्या इनोव्हेटिव कार्याची अपेक्षा आहे. तरुणांनी येणाऱ्या अडचणींना खचून न जाता त्यावर मात करून अशा प्रकारचे कार्य केल्यास हा देश समृद्ध बनेल, असे मत डॉ. देवेंद्र कावडे यांनी व्यक्त केले. प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते. उद्यमशीलता नेहमीच अनुकरणीय असते, असे संस्थाध्यक्ष बाळासाहेब महाजन यांनी यावेळी व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले. पुस्तकाचे संपादक डॉ. मिलिंद बारहाते असून सहसंपादक डॉ. मेधा कानेटकर आणि शरद भावे आहेत. संचालन मेधा कानेटकर यांनी केले, तर आभार शरद भावे यांनी मानले. याप्रंसगी डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी नितीन गडकरी यांच्यासाठी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष कर्नल सुनील देशपांडे, महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उद्योजक उपस्थित होते.