गेल्या २ ते ३ वर्षांत बॉलीवूडमध्ये नव्या विचारांच्या, शैलीच्या दिग्दर्शकांची एक लाटच आली. अनुराग कश्यप, अनुराग बासू, दिबाकर बॅनर्जी यांच्याबरोबरच नावारूपाला आलेलं आणखी एक नाव होतं राजकुमार गुप्ता. आमिर हा त्याचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटातून मॉडेल जेसिका लालची खरी कथा त्याने पडद्यावर आणली. त्याच्या आगामी ‘घनचक्कर’ या चित्रपटात इमरान हाश्मी आणि विद्या बालन अशी वेगळी जोडी दिसणार आहे. या चित्रपटात विद्या-इमरानपैकी नेमका घनचक्करपणा कोणाचा दिसणार ? दिग्दर्शक राजकुमार गुप्ताशी या चित्रपटाविषयी आणि त्याच्या कलाकारांविषयी केलेली बातचीत.
रेश्मा राईकवार
‘घनचक्कर’पणा नेमका कुणाचा?
घनचक्कर म्हणजे खरोखरच वेडेपणा या अर्थानेच तो चित्रपटात दिसणार आहे. वेगळ्या धाटणीचा विनोदी आणि तरीही रहस्यमय असा हा चित्रपट असणार आहे. इमरान हाश्मी आणि विद्या बालन हे दोघेही तरुण पती-पत्नींच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या आयुष्यात काही लोक येतात आणि चित्रपटाचे कथानक वेगळंच वळण घेतं. तो घनचक्करपणा पडद्यावरच अनुभवण्यासारखा आहे.
इमरान हाश्मी आणि विद्या बालन यांना एकत्र आणण्यामागे काय विचार होता?
इमरान आणि विद्याची जोडी खरोखरच वेगळी आहे. दोघेही चांगले कलाकार आहेत. इमरान ज्या प्रकारचे चित्रपट करतो आहे ते पाहता तो एक उत्तम अभिनेता आहे हे नाकारून चालणार नाही. शिवाय माझ्या चित्रपटातली जी व्यक्तिरेखा आहे ती मुळातच लबाड, चालू अशा व्यक्तिमत्त्वाची आहे. तो काय करतोय हे त्याच्या बाहेरच्या वागण्यावरून कळून येत नाही. एकीकडे हाच खरा ढोंगी माणूस आहे हे पटत असलं तरी आपण खात्रीने सांगू शकत नाही अशा प्रकारची ती व्यक्तिरेखा आहे. आणि इमरानचे व्यक्तिमत्त्व त्या व्यक्तिरेखेशी साधम्र्य राखणारे आहे असे मला वाटत होते. विद्याच्या बाबतीत सांगायचे तर ती उत्तम अदाकारी आहे. आताच्या सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी ती एक आहे. माझ्या चित्रपटाची जी नायिका आहे मनमौजी आहे. तिला जे वाटेल ते ती करते, बेधडकपणे बोलते. विद्याशिवाय ही व्यक्तिरेखा कोणी साकारू शकणार नाही याची मला खात्री होती. म्हणून मी या दोघांची निवड केली. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्यक्षातही या दोघांची व्यक्तिमत्त्वं दोन टोकांची आहेत. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्यात एक वेगळी गंमत आहे. आणि तरीही त्यांची ‘केमिस्ट्री’ छान जुळून येते.
विद्या बालनसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
विद्याबरोबर हा माझा दुसरा चित्रपट आहे. याआधी मी तिच्याबरोबर ‘नो वन किल्ड जेसिका’मध्ये काम केले होते. त्यात मला जशी हवी होती तशीच जेसिकाच्या बहिणीची भूमिका विद्याने अक्षरश: जिवंत केली. खरोखरच विद्या एखाद्या चित्रपटासाठी होकार देते तेव्हा ती पूर्णपणे त्या भूमिकेशी, कथेशी स्वत:ला जोडून घेते. अगदी जीव ओतून काम करते. तो फक्त तुमचा चित्रपट राहत नाही. तर तिचाही झालेला असतो. घनचक्कर चित्रपटाचा ट्रेलर जर पाहिलात तर तुम्हाला मी सांगतोय ते पटेल. विद्याने खूप वेगळ्या नि आकर्षक पद्धतीने या चित्रपटातली भूमिका साकारली आहे. तिचा हा स्वभाव प्रत्येक चित्रपटासाठी, दिग्दर्शकासाठी कमाल करून जातो.
‘घनचक्कर’ या चित्रपटात विद्या बालनच्या ‘लूक’वरही मेहनत घेतल्याची चर्चा आहे..
हो. विद्याचा या चित्रपटातला ‘लूक’ खूप वेगळा आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातल्या विरोधाभासाबद्दल एक गंमत सांगू इच्छितो. विद्या नेहमी बाहेर वावरताना साडीतच आपल्याला दिसते. चित्रपटातल्या तिच्या भूमिकाही बऱ्याचदा साडी, सलवार-कमीज अशाच ‘लूक’मधील असतात. पण ‘घनचक्कर’मध्ये तिने या सगळ्याला फाटा दिलाय. त्याचे खरे कारण म्हणजे विद्याला साडी अजिबात आवडत नाही. तिला स्वत:ला फॅशनेबल राहायला आवडतं. किंबहुना फॅशनची आपल्याला चांगली जाण आहे असं तिचं मत आहे. योगायोगाने चित्रपटातील नायिकेलाही कपडय़ांची आवड आहे. त्यामुळे विद्याने मनापासून ही बिनधास्त तरुणीची भूमिका साकारलीय. तिच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा ‘घनचक्कर’मधील भूमिका नक्कीच वेगळी असेल.
‘आमिर’, ‘नो वन किल्ड जेसिका’सारख्या वास्तववादी सिनेमांकडून विनोदी थरारपटाकडे वळण्यामागचे कारण काय?
‘घनचक्कर’ हा चित्रपटही वास्तववादी आहे. अतिशय गंभीर पण नर्मविनोदी शैलीत मांडलेला हा चित्रपट आहे. ‘आमिर’ आणि ‘नो वन किल्ड जेसिका’  हे दोन्ही चित्रपट आशयाच्या दृष्टीने खरोखर वेगळे होते. दिग्दर्शक म्हणून असे वेगवेगळे विषय हाताळण्याची संधी मिळते आहे तर अशाच प्रकारच्या कथा शोधून ते पडद्यावर रंगवणं यातच माझं दिग्दर्शकीय कौशल्य दडलेलं आहे असं मला वाटतं.
वास्तववादी चित्रपटांसाठी हीच योग्य वेळ आहे असे म्हणता येईल का?
प्रेक्षकांना नव्या आशयाचे चित्रपट आवडू लागले आहेत हे मी विश्वासाने सांगू शकतो. ‘आमिर’ आणि ‘नो वन किल्ड जेसिका’ दोन्ही चित्रपट वेगळ्या जातकुळीचे होते. त्यात व्यावसायिक मसाला नव्हता. वास्तवावर आधारित चित्रपट असूनही लोकांना ते आवडले. मला वाटतं आताचा प्रेक्षक हा अधिक विचारी, समजूतदार आणि खुल्या मनाचा आहे. हे सत्य इंडस्ट्रीनेही पचवले असल्यामुळे निर्मातेही वास्तववादी चित्रपट निर्मितीसाठी पुढे येत आहेत.
आपल्या प्रत्येक चित्रपटाने शंभर-दोनशे कोटींचा व्यवसाय करावा असे वाटते का?
चांगला चित्रपट बनविणे हे दिग्दर्शकाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तुमच्या चित्रपटाला जास्तीतजास्ती प्रेक्षकांची उपस्थिती असेल तर दिग्दर्शक म्हणून तुम्ही समाधानीही असता आणि व्यावसायिक  यशही तुम्हाला मिळालेलं असतं. पण त्यासाठी तुम्ही अत्यंत निष्ठेने, विषयाशी प्रामाणिक राहून तुमचा चित्रपट करायला पाहिजे. तुम्हाला नेमका कसा चित्रपट करायचा आहे हे समजलं पाहिजे. मग जर तुमच्या चित्रपटाने शंभर कोटी रुपये कमावले तर ते नकोत कुणाला? दिग्दर्शक म्हणून तुम्ही चांगला चित्रपट देणं महत्त्वाचं. नफ्या-तोटय़ाचं गणित हे त्यानंतर येतं.
‘घनचक्कर’ हा तिसरा चित्रपट आहे. याही चित्रपटाला यश मिळालं तर अजूनही वेगवेगळे प्रयोग करता येतील असा विश्वास राजकुमार गुप्ता व्यक्त करतात. बॉलीवूडमध्ये वेगळ्या वाटेने जाऊ पाहणाऱ्या या दिग्दर्शकाचा ‘घनचक्कर’पणा बॉक्स ऑफिसवर किती कमाल साधतो यावर त्याची पुढची वाटचाल अवलंबून आहे.