सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून जिल्हा परिषद उभारत असलेल्या ४९८ प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ांच्या कामाची चौकशी ज्येष्ठ सदस्यांच्या समितीमार्फत करण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या समितीने एक आठवडय़ात अहवाल द्यावा, तोपर्यंत अंगणवाडय़ा उभारणीचे काम थांबवण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी वादळी चर्चेनंतर जाहीर केले.
लंघे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. २८ पैकी १६ कोटी रुपये मार्चपर्यंत खर्च न झाल्यास ते परत जातील, याकडेही लंघे यांनी लक्ष वेधले. राजेंद्र फाळके, सुभाष पाटील, बाळासाहेब हराळ, अण्णासाहेब शेराळ यांच्यासह अधिका-यांचा समावेश असलेली समिती नियुक्त केली जाणार आहे. सध्या सुमारे दोनशेहून अधिक आंगणवाडय़ा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
हराळ यांनी नमुन्याप्रमाणे बांधकाम होत नाही. काम निकृष्ट आहे, त्यामुळे लहान मुलांच्या जीवितास धोका होऊ शकतो. किंमत जरी साडेचार लाख असली तरी, हे काम केवळ तीन लाखात होऊ शकते. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व महिला व बालकल्याण विभागाच्या अधिका-यांनी केलेल्या गडबडीने जि. प.ची फसवणूक झाली आहे, असा आरोप केला. राजेंद्र फाळके, सचिन जगताप यांनी काही सदस्यांचे प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ांचे काम चांगले असल्याचे मत आहे, ज्या ग्रामपंचायतींना प्री-फॅब्रिकेटेड नको आहेत, त्यांनी नाकाराव्या, अशी सूचना केली. सुभाष पाटील, परमवीर पांडुळे, बाबासाहेब दिघे आदींनी चर्चेत भाग घेतला.
कृतियुक्त अध्ययन पद्धती
तामिळनाडू व छत्तीसगढ राज्याप्रमाणे नगर जिल्ह्य़ातील प्राथमिक शाळांतही कृतियुक्त अध्ययन पद्धती (अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग-एबीएल) प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यासाठी सभेत निवृत्त शिक्षणाधिकारी प्रकाश परब (पुणे) व निवृत्त उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण यांनी सादरीकरण केले. उपाध्यक्ष मोनिका राजळे व शिक्षण समितीच्या सदस्यांनी पुणे जिल्ह्य़ात राबवलेल्या या प्रयोगाची काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती. त्यासाठी एका शाळेस केवळ ३५ हजार रुपये खर्च येतो.
भोगले तोंडघशी
जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले सभेत चांगलेच तोंडघाशी पडले. मागील सभेत समाजकल्याण विभागाच्या सायकल, शिलाई मशिन व पुस्तक खरेदीतील अनियमिततेची चौकशी करण्याचा निर्णय झाला होता. परंतु ‘कॅफो’यांनी केवळ सायकल व पुस्तक खरेदीची चौकशी केली. पुस्तक खरेदीत कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे भोगले छातीठोकपणे सांगत होते. त्यावरून भोगले व हराळ यांच्यात खडाजंगी रंगली. परंतु चौकशीत पुस्तक खरेदीत अनियमितता झाल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी स्पष्ट केले. शिलाईयंत्र खरेदीची चौकशी करण्यात येईल, असेही अध्यक्ष लंघे यांनी सांगितले.