रेल्वे रुळांच्या क्लिप्स काढण्याची घटना रेल्वेने गंभीरतेने घेतली असून रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल तसेच शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाकरवी आरोपींचा युद्धस्तरावर शोध सुरू झाला आहे.
रेल्वे पथ निरीक्षक हा रेल्वेचा स्वतंत्र विभाग असून या विभागातील विविध पथके ट्रॉलीवर बसून रेल्वे मार्गाचे निरंतर निरीक्षण करीत असतात. गुरुवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे अभियंता लीलाधर सुवर्णकार यांच्या नेतृत्वाखालील पथक नागपूर ते हावडा रेल्वे मार्गावरील कळमना- इतवारी दरम्यान निरीक्षण करीत होते. रेल्वे रुळांवरील ४५ क्लिप्स काढून रुळांच्या बाजूला ठेवण्यात आल्याचे दिसले. त्यांनी तातडीने रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षात कामावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गांभीर्य ओळखून तातडीने धावाधाव केली. काहीवेळातच येथून दुर्ग पॅसेंजर, टाटानगर- इतवारी, गोंदिया-इतवारी मेमू आदी गाडय़ा जाणार होत्या. त्यांना थांबवण्यात आले.
रेल्वे रुळांना एकमेकांशी फिश प्लेट्सने जोडल्यानंतर रुळाखालील स्लीपरशी प्रेडॉल क्लिप्सने मजबूत केले जाते. या क्लिप्स काढल्या तर रुळांची स्लीपरवरील पकड ढिली होती. त्यावरील डब्यांची चाके घसरून गाडी रुळाखाली येते. गाडी वेगात  असेल तर मोठा अपघात होतो. त्यामुळे या क्लिप्स काढण्याची बाब गंभीर ठरते. या घटनेने खळबळ उडाली. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रेल्वेच्या तंत्रज्ञांचे पथक तातडीने तेथे पोहोचले आणि त्यांनी या क्लिप्स पुन्हा घट्ट बसविल्या. दहशतवाद विरोधी पथकानेही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रेल्वेने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे चार निरीक्षक, दोन सहायक उपनिरीक्षक, एक उपनिरीक्षक, रेल्वे पोलीस तसेच लकडगंज पोलीस यांचे संयुक्त चौकशी पथक तयार करण्यात आले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त डी.बी. गौर या पथकाचे प्रमुख आहेत.
या क्लिप्स सलग काढलेल्या नव्हत्या. तुटक-तुटक काही अंतरावरील रुळांच्या काढलेल्या होत्या. काही क्लिप्स अर्धवट निघालेल्या होत्या. त्या कंपनामुळे निघाल्या असाव्यात, अशी शंका आहे. या घटनेपूर्वी रेल्वे रुळांवर कोण गेले होते, याची चौकशी या पथकाने सुरू केली.
५० हून अधिक संशयीतांची ताब्यात घेऊन कसून चौकशी या पथकाने केली. या घटनेमागे दहशतवादी कृत्य आहे का, चोरीचा उद्देश तर नाही ना आदी विविध कंगोरे तपासले जात आहेत. गुप्तचर तसेच खबऱ्यांमार्फतही माहिती काढली जात आहे.