पूर्व विदर्भात गडचिरोली जिल्ह्य़ात सर्वाधिक पाऊस झाला असून खरीप हंगामात १०२ टक्के पेरणी आटोपली आहे. काही जिल्ह्य़ांत कापूस, तूर, सोयाबीन व धानावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
नागपूर जिल्ह्य़ात ७०१ मी.मी., भंडारा ७५४ मी.मी., गोंदिया ९३१मी.मी., वर्धा ६९७ मी.मी., चंद्रपूर ६२८ मी.मी. आणि गडचिरोली जिल्ह्य़ात १०८३ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. पूर्व विदर्भात खरीप हंगामातील सर्वसाधारण पेरणी क्षेत्र १८ लाख, ३१ हजार, ५०० हेक्टर असून १८ लाख, ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी आटोपली आहे. वर्धा जिल्ह्य़ात  सोयाबीनची १ लाख, २१ हजार हेक्टर व कापसाची २ लाख, २६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. या आठवडय़ात जिल्ह्य़ात पाऊस झाल्याने पिकांची चांगली वाढ होत आहे. कापसावर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.
नागपूर जिल्ह्य़ात यावर्षी कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्य़ात १६ हजार हेक्टर क्षेत्रावर पऱ्हे टाकण्यात आले असून १७ हजार हेक्टर क्षेत्रावर आवत्या व १ लाख, ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर रोवणी झाली आहे. जिल्ह्य़ात धानावर कडा-करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. गोंदिया जिल्ह्य़ात भारी धान फुटवेच्या अवस्थेत आहे. तूर व धान रोपावर खोडकीड व पान गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. क्रॉपसॅप योजनेंतर्गत भात पिकाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ात सात हजार हेक्टर क्षेत्रावर पऱ्हे टाकण्यात आले असून २२ हजार हेक्टर क्षेत्रावर आवत्या व १ लाख, २२ हजार हेक्टर क्षेत्रावर रोवणी झाली आहे. जिल्ह्य़ात कापसाचा पेरा वाढला असून सोयाबीनच्च्या पेरणीत घट झाली आहे. कापसावर पांढरी माशीचा तर सोयाबीनवर स्पोडोप्टेरा अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. गडचिरोली जिल्ह्य़ात ११ हजार हेक्टर क्षेत्रावर पऱ्हे टाकण्यात आले असून ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर आवत्या व १ लाख, २९ हेक्टर क्षेत्रावर रोवणी झाली आहे. जिल्ह्य़ात कापूस व तूर पिकांची स्थिती समाधानकारक आहे. पूर्व विदभात धान रोपावरील खोडकीड व पान गुंडाळणाऱ्या अळीचे प्रमाण सध्या कमी आहे. किडींचा मोठा फटका अजून बसला नसला तरी पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी किटकनाशकांची फवारणी सुरू केली आहे. पावसाने कीड रोग धुवून निघत असल्याने या आठवडय़ात झालेला पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरला आहे.