शासनाच्या दंत विभागाचे सहसंचालक डॉ. मानसिंग पवार यांच्या नेतृत्वाखालील एका चमूने शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या विविध विभागाचे निरीक्षण केले. 

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे दरवर्षी दंत रुग्णालयाचे निरीक्षण केले जाते. दंत विभागाचे सहसंचालक डॉ. मानसिंग पवार यांच्या नेतृत्वाखालील एका चमूने रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. या चमूमध्ये डॉ. डांगे, डॉ. सिंग, डॉ. चव्हाण यांचा समावेश होता. या चमूने रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभाग, शस्त्रक्रियागृहाची पाहणी केली. तसेच गेल्या एक महिन्यात बाह्य़रुग्ण विभागात आलेल्या रुग्णांची संख्या, रुग्णालयातील यंत्रे सुरू आहेत वा बंद आहेत, याची माहिती घेतली.
यानंतर महाविद्यालयांच्या विविध विभागांना भेटी देऊन त्याचे निरीक्षण केले. संपूर्ण दिवसभर पाहणी केल्यानंतर ही चमू आपला अहवाल नाशिक विद्यापीठाला सोपवणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यावेळी दंत रुग्णालयातील विविध विभागाचे प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते. ही चमू बीडीसच्या दहा जागांवर निर्णय घेणार होते, अशी चर्चा होती. परंतु या चमूने असा कोणताही निर्णय जाहीर केला नाही. या चमूने सादर केल्यानंतरच या दहा जागांचे भवितव्य अवलंबून आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.