वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग,
गुन्हे शाखा, पुणे शहर
सर्व क्षेत्रातील मंडळींना सामावून घेऊन प्रेमाची अनुभूती देणारा, आनंद देणारा, उत्साह देणारा, जगात काही चांगलेही आहे याची प्रचिती देणारा असा हा आमचा क्लब हे आम्हा सर्वासाठी एक मोठे स्फूर्तिस्थानच आहे. ‘सॅटर्डे क्लब’च्या शतकी वाटचालीबद्दल..
साहित्यिक असोत की राजकारणी, पत्रकार, संपादक, प्रशासकीय अधिकारी असोत की अगदी कवी वा संगीतकार.. संवेदनशील मनांचा एक गट म्हणजे आमचा पुण्यातील ‘सॅटर्डे क्लब.’ हे नाव ऐकून बऱ्याच जणांना हा कशाचा क्लब आहे ते काही उमगत नाही. माझेही चार वर्षांपूर्वी तसेच झाले होते. सॅटर्डे क्लबमध्ये मी पहिल्यांदा गेलो, तो शनिवार आजही आठवतोय. २६/११ ची घटना नुकतीच होऊन गेली होती. मुंबई पोलीस दलात मी एकवीस वर्षे काम केले आहे आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर यांच्या बरोबर मी मुंबईत नऊ वर्षे काम केले होते. मुंबईतील माझ्या या कामाची पाश्र्वभूमी श्री. अंकुश काकडे यांना माहिती होती. त्यांनीच मला पहिल्यांदा ‘सॅटर्डे क्लब’मध्ये बोलावले आणि मग त्या मंडळींनी मला क्लबचे सदस्य करून घेतले.
मी पहिल्यांदा या क्लबमध्ये गेलो होतो त्या शनिवारी मी तेथे लोखंडवाला शूटआऊट, मी केलेले एनकाउंटर, गँगस्टर्सविरुद्ध तसेच खलिस्तानी आणि एलटीटीईच्या अतिरेक्यांविरुद्ध केलेल्या कारवाया.. ते सारे अनुभव त्या दिवशी मी तेथे सांगत होतो. तेव्हा ऐकणाऱ्यांच्या अंगावर देखील शहारे येत होते. सर्वच जण नि:शब्द होऊन माझ्या चेहऱ्याकडे बघत राहिले होते. त्यांच्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होत्या. खूप शांतता होती. सर्व अनुभव सांगितल्यानंतरही काही सेकंद शांतता तशीच राहिली होती. त्यानंतर एक एक प्रश्न विचारले जाऊ लागले आणि मी त्या प्रश्नांची उत्तरे देत गेलो. क्लबच्या सदस्यांबरोबर जो काही वेळ मी त्या दिवशी व्यतीत केला तो माझ्यासाठी खरोखरच अविस्मरणीय अनुभव होता. कारण तेथील वातावरण अतिशय आपुलकीचे होते. पोलीस खात्यातील प्रत्येक जण अशा वातावरणासाठी नेहमीच आसुसलेला असतो. त्यातल्या त्यात मी स्वत:ला नक्कीच भाग्यवान समजतो, की अशा क्लबने मला नुसते अनुभव सांगायला बोलावले नाही, तर सदस्यही करून घेतले.
असा हा आमचा सॅटर्डे क्लब शनिवारी; म्हणजे २९ डिसेंबरला आपले शतक अर्थात शंभरावा दिवस पूर्ण करीत आहे. त्यानिमित्ताने क्लबविषयीच्या माझ्या भावना मांडण्याचाच हा छोटासा प्रयत्न आहे. सॅटेर्डे क्लब म्हणजे पुण्यातील असे एक व्यासपीठ आहे, की जेथे राजकारण, कला, साहित्य, संगीत, नाटय़, चित्रपट, क्रीडा, पत्रकारिता, प्रशासन, समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येतात आणि विचारांचे आदान-प्रदान करतात. सध्या या क्लबचे १०५ सदस्य आहेत. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सर्व जण एकत्र जमतात. मनोरंजन, विविध विषयांवर चर्चा, विचार विनिमय करीत सर्व जण स्नेहभोजन करतात. एवढेच नाही, तर प्रत्येक सदस्याचा वाढदिवसही साजरा केला जातो. सन २००४ पासून हा क्लब सक्रिय आहे. मी सन २००८ पासून क्लबचा सदस्य आहे. क्लबच्या सदस्यांपैकी कोणीच भेटण्याचा दिवस चुकवत नाही. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ज्या सदस्यांनी यजमानपद स्वीकारले असेल, त्यानेच जागेसह भोजन वगैरे व्यवस्थांचे सर्व नियोजन करायचे असते. यजमानपदाचा मान एक एक करून सर्व सदस्यांना मिळत असतो. त्या महिनाभरात घडलेल्या देशातील, तसेच राज्यातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींवर क्लबमध्ये मोकळेपणाने चर्चा केली जाते. मते मांडली जातात. याशिवाय मनोरंजनाचे दर्जेदार कार्यक्रम देखील होत असतात. क्लबचे सदस्य उपेंद्र भट यांचे गायन असो, रामदास फुटाणे यांच्या वात्रटिका असोत, सुधीर गाडगीळ यांचे सूत्रसंचालनातून हसत हसत एखाद्याला चिमटे घेणे असो, राजकीय नेत्यांनी एकमेकांना दिलेल्या कोपरखळ्या असोत, युवराज शहांचे बातमीपत्र असो किंवा अंकुश काकडे यांचे खटय़ाळ चिमटे असोत, श्रीकांत शिरोळे यांचे चपखल मार्गदर्शन असो की श्रीनिवास पाटलांच्या लावण्यांच्या चार ओळी असोत.. सर्वच जण त्यावेळी सर्व काही विसरून क्लबमधील कार्यक्रमात एकरूप झालेले असतात.
वरिष्ठ, कनिष्ठ, मोठा, लहान, अधिकारी, नोकर, कलावंत, राजकारणी असा कोणताही भेदभाव सॅटर्डे क्लबमध्ये नसतो. अशाप्रकारचा क्लब चालविणे जितके वाटते तितके सोपे नक्कीच नाही. अर्थात तेवढे कठीण ही नाही म्हणा. कारण सकारात्मक दृष्टीने सर्व काही विसरून क्लबमध्ये मनाने पूर्णपणे सहभागी होणे, एवढय़ा एका मंत्राचे सर्वानी पालन केले आहे. त्यामुळेच हा क्लब आजपर्यंत टिकून आहे आणि प्रत्येक महिन्याचा एक शनिवार आम्हा सर्वासाठी आनंद देणाराच ठरत आहे.
आम्हा पोलीस अधिकाऱ्यांना या क्लबचा एक वेगळाच फायदा होतो. वर्षांतील आमचा अधिक वेळ हा कोणत्या न कोणत्या बंदोबस्तासाठी खर्ची होत असतो. त्यातील महत्त्वाचा बंदोबस्त असतो तो गणेशोत्सवाचा. त्या वेळी नागरिकांकडून आम्हांला सहकार्याची अपेक्षा असते. किंबहुना आवश्यकता असते. गणेशोत्सव शांततेने पार पाडण्यासाठी क्लबच्या सदस्यांच्या वेगवेगळ्या सूचनांचा आम्हाला मोठा उपयोग होतो. तसे म्हटले तर या क्लबचा वैयक्तिक जीवनातही खूप फायदा होतो. एकाच व्यासपीठावर एकाच वेळी समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येतात. विविध क्षेत्रातील व्यक्ती, तज्ज्ञ त्यांचे विचार मांडतात, मते व्यक्त करतात. त्यामुळे समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांचे विचार समजून घेता येतात. आपलेही विचार व्यक्त करण्याची संधी येथे मिळते. रोजच्या धावपळीच्या जीवनात महिन्यातून असा एखादा दिवस खरोखरी स्फूर्तिदायक ठरतो.
सॅटर्डे क्लब म्हणजे आमचे एकच वेगळेच विश्व आहे असे मी मानतो. येथे एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा अनुभवायला मिळतो. रोजच गुन्हेगारांबरोबर राहताना जगातील चांगुलपणा कमी होत चालला आहे का हा विचार मनात येत असतो. अशावेळी सॅटर्डे क्लबमुळे समाजातील चांगल्या माणसांच्या सहवासात राहता येते आणि तो अनुभव खूपच सुखावह असतो. जो कोणी अतिथी म्हणून क्लबमध्ये येतो, त्याला पहिल्याच भेटीत क्लबविषयी जवळीक निर्माण होते आणि तो देखील मनापासून क्लबचा सदस्य होऊ इच्छितो, हे क्लबच्या अनेक वैशिष्टय़ांमधील एक वैशिष्टय़ म्हणून सांगायला आहे. सर्व क्षेत्रातील मंडळींना सामावून घेऊन प्रेमाची अनुभूती देणारा, आनंद देणारा, उत्साह देणारा, जगात काही चांगलेही आहे याची प्रचिती देणारा असा हा आमचा क्लब हे आमचे एक मोठे स्फूर्तिस्थानच आहे. आमचा हा सॅटर्डे क्लब असाच पुढे चालत राहील, असा माझा विश्वास आहे. शंभराव्या सॅटर्डे क्लबला माझ्या मनापासून शुभेच्छा.