शहरात लूटमारीच्या घटना वाढत असून गंगापूर रोडवरील घटना ताजी असतानाच लहवीत रस्त्यावर रात्रीच्या सुमारास एका अल्पबचत प्रतिनिधीवर हल्ला चढवत त्याच्याकडील रोकड आणि कलेक्शन मशीन असा ३३ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन दिवसांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास ही घटना लहवीत रस्त्यावरील देशमुख मळ्याजवळ घडली. अल्पबचत प्रतिनिधी म्हणून काम करणारे दशरथ मुसळे सायकलवरून निघाले होते. यावेळी काही चोरटय़ांनी गाठून काठीने त्यांच्यावर हल्ला चढविला. डोक्यात काठी बसल्याने ते खाली कोसळले. या गोंधळाचा फायदा घेत त्यांच्याकडील २३ हजार रुपयांची रोकड आणि दहा हजार रुपयांचे कलेक्शन मशीन घेऊन संशयितांनी पलायन केले. आसपासच्या नागरिकांना हा प्रकार लक्षात येईपर्यंत चोरटे पसार झाले होते. मारहाणीत जखमी झालेल्या मुसळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस उपचार सुरू असल्याने त्यांना पोलिसांकडे दाद मागता आली नाही. या प्रकरणी मंगळवारी रात्री त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गंगापूर रस्त्यावरील एचडीएफसी बँकेतून एकाने काढलेली चार लाखाची रोकड चोरटय़ांनी लंपास केली होती. बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्यांवर नजर ठेवून ती लंपास करण्याचे काही प्रकार याआधी घडले आहेत. देवळाली कॅम्प परिसरात घडलेल्या घटनेत संबंधित व्यक्ती अल्पबचत प्रतिनिधी असल्याचे हेरून चोरटय़ांनी ही रक्कम लंपास केली असण्याची शक्यता आहे.