जिल्हा वार्षिक योजना २०१२-१३ च्या खर्चाला जिल्हा नियोजन समितीने मंजुरी प्रदान केली. सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोगना, ओटीएसपी व अनुसूचित जाती उपयोजना या चारही योजना मिळून मार्च २०१३ अखेर ९९ टक्के खर्च झाला. पावसाळ्यात खरीप हंगामासाठी खत, बियाणे व कर्जवाटप वेळेवर करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय देवतळे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे, खासदार हंसराज अहीर, आमदार शोभा फडणवीस, नाना शामकुळे, अतुल देशकर, सुभाष धोटे, प्रभारी जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.माधवी खोडे व उपविभागीय अधिकारी आशुतोष सलील उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा परिषद, नगर पालिका व महानगरपालिका क्षेत्रातून निवडून आलेल्या ३२ सदस्यांचा परिचय करून देण्यात आला. २०१२-१३ या आर्थिक वर्षांत सर्वसाधारण योजना १३० कोटी ९४ लाख ४० हजार, आदिवासी उपयोजना ६८ कोटी ७४ लाख ७ हजार, ओटीएसपी २३ कोटी ५६ लाख ४७ हजार व अनुसूचित जाती उपयोजना ४२ कोटी ४१ लाख ६३ हजार, असा एकूण २६५ कोटी ६६ लाख ५७ हजाराचा खर्च झाला. खर्चाची टक्केवारी ९५.५ टक्के एवढी आहे. या खर्चाला अध्यक्ष व समिती सदस्यांनी मंजुरी प्रदान केली.
जिल्हा वार्षिक योजना २०१३-१४ चा नियोजन आराखडा मंजूर झाला असून प्रस्तावित कामांचे प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाने तातडीने मान्यता द्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. चालू आर्थिक वर्षांचा खर्च फेब्रुवारीपूर्वीच होईल, यासंबंधीचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत मागास क्षेत्र अनुदान निधीचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. केंद्र पुरस्कृत या योजनेत ग्राम पंचायतींनी विविध कामांसाठी ठराव करून विकास कामे करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, खरीप हंगाम सुरू होत असून बियाणे, खत व कर्ज वाटप वेळेवर होईल, याची दक्षता घ्या. बोगस बियाणे आढळता कामा नये म्हणून भरारी पथके नेमण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. पावसाळ्यातील पूर परिस्थितीबाबतही सतर्कता बाळगण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले. कृषी विभागाने शिंगाडय़ाची दोन लाख रोपे तयार केली असून ७५ शेतकऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. शिंगाडय़ाची रोपे कृषी विभागातर्फे मोफत वितरित करण्यात येणार असल्याचे अशोक कुरील यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत खासदार, आमदार व नवनियुक्त सदस्यांनी आपल्या समस्या मांडल्या. बैठकीचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम.सोनकुसरे यांनी केले, तर आभार सहायक आयुक्त समाजकल्याण मंगेश वानखेडे यांनी मानले.