मुजोर आणि प्रवाशांची लूट करणाऱ्या रिक्षाचालकांना अभय देणाऱ्या पनवेल आरटीओ अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ जनजागृती ग्राहक मंचाच्या वतीने २१ जून रोजी सकाळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पनवेलकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.
रिक्षाचालक आणि आरटीओ आधिकाऱ्यांची युती सर्वसामान्य पनवेलकरांचा खिसा कापत आहे. नागरिकांनी आंदोलने केल्यानंतर रिक्षाचालकांवर कारवाईची फक्त आश्वासने आरटीओ अधिकाऱ्यांकडून दिली जातात; प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढत आहे. रिक्षाचालक नियम धाब्यावर बसवून प्रवाशांकडून भरमसाट भाडे उकळत आहेत. याविरोधात मंचाने गेल्या वर्षांत केलेल्या धरणे आंदोलनाच्या वेळी १ मार्च २०१४ पर्यंत पनवेलमधील सर्व रिक्षा मीटरप्रमाणे भाडे आकारतील असे आश्वासन तात्कालीन परिवहन अधिकारी शरद जिचकर यांनी दिले होते, मात्र यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि पुन्हा एकदा हा विषय रेंगाळत राहिला. त्यामुळे अधिकाऱ्यांना या प्रश्नावर पुन्हा जागे करण्यासाठी शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निषेध धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंचाचे पनवेल तालुका शाखेचे अध्यक्ष पी. जी. सावंत यांनी दिली आहे. पनवेलमध्ये रिक्षाचालकांनी नियमाप्रमाणे मीटरभाडे घ्यावे या मागणीसाठी सर्व संस्थांनी, नागरिकांनी पनवेल आरटीओ कार्यालयाजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.