जळगाव जिल्ह्य़ातील केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आ. जगदीश वळवी यांनी हवामान मापकाच्या प्रश्नावरून विमा कंपनीविरुद्ध पत्राद्वारे दाखविलेल्या अविश्वासावर मुंबईत फलोत्पादनमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या दालनात बैठक होऊन या हवामान मापक यंत्रणेची चौकशी पंधरा दिवसांत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डिसेंबर व जानेवारी २०१२ मध्ये अति थंडीमुळे केळी पिकांवर विपरीत परिणाम होऊन उत्पादकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. उत्पादकांनी महाराष्ट्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत केळीचा विमा उतरविला होता. त्यांचे नुकसान झाले असतानाही विमा कंपनीने त्यांच्या हवामान मापक यंत्रणेचा संदर्भ देत भरपाई देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे केळी उत्पादकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. यासंदर्भात उत्पादकांनी आ. जगदीश वळवी यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. आमदारांनी याप्रश्नी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर फलोत्पादनमंत्री डॉ. गावित यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत आ. वळवी यांच्यासह सर्वानी विमा कंपनीने त्यांची यंत्रणा नियमानुसार योग्य ठिकाणी लावलेली नव्हती असे म्हणणे मांडले. याबाबत छायाचित्रासह आ. वळवी यांनी मंत्र्यांना केळी उत्पादकांची बाजू पटवून दिली. विमा कंपनीने स्वत:च्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. तसेच केळी उत्पादकांना विमा कंपनीने भरपाई देण्याची  मागणी करण्यात आली.
या बैठकीनंतर डॉ. गावित यांनी जळगाव जिल्ह्य़ात विशेषत: चोपडा तालुक्यात विमा कंपनीच्या हवामान मापक यंत्रणेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
या चौकशीसाठी हैदराबाद येथील हवामान खात्याचे तज्ज्ञ, राहुरी कृषी विद्यापीठाचे कृषी अधिकारी तसेच विमा कंपनीचे अधिकारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या चौकशी समितीने फलोत्पादन मंत्र्यांना पंधरा दिवसांत अहवाल सादर करावयाचा आहे. चौकशी पारदर्शक व्हावी म्हणून तालुक्याचे आमदार, गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य तसेच परिसरातील मान्यवर यांच्या उपस्थितीत पंचनामे करून त्यांची स्वाक्षरी घेण्याची अट टाकण्यात आली आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीत फलोत्पादन विभागाचे सचिव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत महाजन, अनिल साठे, अ‍ॅड. डी. पी. पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.म