आपल्याकडे एकाच दिवशी एकापेक्षा अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित होणे ही शोकांतिका आहे. हिंदूीशी स्पर्धा समजू शकतो. पण सध्या मराठी चित्रपटसृष्टीतही स्पर्धा तीव्र होत चालली आहे. त्याला नाइलाज आहे. राज्य सरकारच्या वतीने मराठी चित्रपटांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानास आपला विरोध असल्याचे दिग्दर्शक व अभिनेत्री कांचन धर्माधिकारी यांनी येथे सांगितले.
सहा जून रोजी धर्माधिकारी दिग्दर्शित तसेच हर्षवर्धन भोईर निर्मित व भाऊसाहेब भोईर प्रस्तुत ‘हुतूतू’ चित्रपट नाशिकसह महाराष्ट्रात इतरत्र प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्य शासनाच्या वतीने मराठी चित्रपटांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानासाठीच्या अटी व नियम धर्माधिकारी यांना आक्षेपार्ह वाटतात.
याशिवाय चित्रपट निर्मितीत तंत्रावर अधिक भर देण्यात येत असल्याबद्दलही त्यांनी नापसंती दर्शविली. आजवर ‘मोकळा श्वास’, ‘मानिनी’ या चित्रपटांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आपण हाताळले आहेत. राष्ट्रीय पुरस्काराच्या स्पर्धेतही ‘मोकळा श्वास’ होता. परंतु काही कारणामुळे तो पुढे जाऊ शकला नाही याची खंत आजही असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची इच्छा आहे. परंतु, काही तांत्रिक तसेच आर्थिक बाबींमुळे आणि विषय चांगला न मिळाल्याने काम सुरू करण्यात आलेले नाही असेही त्यांनी सांगितले.
हुतूतू हा चित्रपट संपूर्णपणे विनोदी धाटणीचा असून कुटुंबासमवेत पाहता येईल, असा असल्याचे त्यांनी नमूद केले. पंजाबी चित्रपट ‘डॅडी कूल, मुंडे कूल’ या चित्रपटावर ‘हुतूतू’ आधारित आहे. दोन वाया गेलेली उनाड मुले आणि त्यांना वठणीवर आणण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करणारे वडील या चित्रपटात दिसतील. आई मिळाल्यावर मुले सुधारतील या अपेक्षेने उतारवयात वडिलांनी वधू शोधण्याची हाती घेतलेली मोहीम आणि त्यातून सुरू होणारा प्रेमाचा विनोदी असा संघर्ष ‘हुतूतू’मध्ये मांडण्यात आला आहे. त्याग, समर्पण यांना प्रेम मानणाऱ्या जुन्या पिढीचा एक संघ आणि प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा नव्या पिढीचा दुसरा संघ चित्रपटात पाहावयास मिळेल असे धर्माधिकारी यांनी सांगितले. चित्रपटात अशोक सराफ, कांचन धर्माधिकारी, वर्षां उसगावकर, अनंत जोग, प्रदीप पटवर्धन, जयवंत भालेकर, अतुल तोडणकर आदींच्या भूमिका आहेत. चित्रपट नाशिककरांच्या पसंतीस पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.